एमजीएमच्या ऑलिंपिकला सुरुवात
व्यक्तिमत्व विकासासाठी मैदान हे सर्वोत्तम ठिकाण – विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा
छत्रपती संभाजीनगर : समकालीन काळामध्ये प्रत्येक कामासाठी आपण यंत्राची मदत घेत असल्याकारणाने आपले शारीरिक श्रम कमी होत आहेत. आपण समाजमाध्यमे, मोबाईल, संगणक यामध्ये व्यस्त असताना दिसत आहोत. याचा परिणाम म्हणून आपले मैदानी खेळांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसत आहे. मात्र, मैदानी खेळकडे सर्वांनी लक्ष देत दररोज यासाठी काहीसा वेळ राखीव ठेवणे काळाची गरज आहे. आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी आणि ते आंतरबाह्य बदलायचे असेल तर सर्वात चांगले ठिकाण म्हणजे मैदान असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी यावेळी केले. महात्मा गांधी मिशनच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून एमजीएम विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एमजीएम ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळा आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत एमजीएम क्रिकेट स्टेडियम येथे संपन्न झाला. यावेळी, छत्रपती संभाजीनगर चे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधला.
यावेळी, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, उद्योजक रणजित कक्कड, अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, क्रीडा संचालक नितीन घोरपडे क्रीडा विभागप्रमुख प्रा.डॉ. दिनेश वंजारे, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, खेळाडू व सर्व संबंधित उपस्थित होते.
पुढे बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा म्हणाले, एमजीएम संस्थेची स्थापना १९८२ मध्ये झाली असून आज संस्थेंतर्गत सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. २०१५ पासून या एमजीएम ऑलिंपिकची सुरुवात झाली असून या ८ व्या ऑलिंपिकचे यशस्वीपणे आपण सर्वांनी यशस्वीपणे आयोजन केलेले आहे. यामध्ये सर्व सहभागी खेळाडूंचे मी अभिनंदन करीत आपणास स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. एमजीएममध्ये शिकलेले विद्यार्थी आज भारतासह जगामध्ये आपले नाव करीत आहेत. महात्मा गांधी यांच्या नावाने आपली ही संस्था कार्यरत आहे. महात्मा गांधी यांना खेळाची आवड होती.त्यांना क्रिकेट, टेनिस आणि फुटबॉल हे खेळ आवडत होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना तेथील लोकांना सोबत घेऊन ट्रान्स बॉल इंडियन फ़ुटबाँल असोसिएशनची स्थापना केली होती. महात्मा गांधी यांनी शिक्षणासह शारीरिक श्रमाला महत्व दिले होते. विशेषत त्यांच्या शैक्षणिक धोरणात शारीरिक श्रमाला अग्रक्रमाने स्थान होते.
सर्व महान लोकांनी आपल्या जीवनामध्ये मैदानी खेळाला अनन्यसाधारण महत्व देत त्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवलेले आहे. आज जे काही अधिकाऱ्यांचे गुण माझ्यामध्ये विकसित झाले आहेत, त्यामध्ये मी माझ्या प्रशिक्षण कालावधीमध्ये जे काही मैदानी खेळ खेळले त्यास योगदान देत असतो. आपण सर्वांनी आपल्या या अमूल्य शरीरासाठी दिवसातील ३० मिनिट वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन नियोजनात ३० मिनिटांची वेळ ही खेळासाठी राखीव ठेवली पाहिजे. प्रत्येकांनी कोणत्या ना कोणत्या एका खेळाची आवड जोपासत शारीरिकदृष्ट्या सुदृढ असायला हवे. आपल्यात नेतृत्व क्षमता, निर्णय क्षमता, ध्येय निश्चित करीत ते प्राप्त करणे हे सगळे गुण आपण मैदानात शिकत असतो. खेळामुळे आपण मानसिक आनंदासह शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतो. विशेषत: यामुळे आपल्या जीवनात परिवर्तन होईल, असा विश्वास विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केला.
दरवर्षी एमजीएम संस्थेंतर्गत असणाऱ्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘एमजीएम ऑलिंपिक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धेत एमजीएम संस्थेच्या नांदेड, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. एमजीएमच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित येत एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने एमजीएम ऑलिंपिकची सुरुवात कुलपती अंकुशराव कदम यांच्या दूरदृष्टितून झाली आहे. आपण इतरांकडून शिकत पुढे जात राहायला पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्त्वात खेळामुळे सुधारणा होत असल्याचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयांच्या संघाची मार्च पास परेड झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक नितीन घोरपडे यांनी केले तर आभार क्रीडा विभागप्रमुख डॉ.दिनेश वंजारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.शशिकांत सिंग, डॉ.श्रीनिवास मोतीयेळे, डॉ.सदाशिव जव्हेरी, प्रा.रहीम खान, डॉ.अमरदीप असोलकर, बालाजी शेळके व सर्व संबंधितांनी आपले योगदान दिले आहे.