विभागीय गणितीय स्पर्धेत एमजीएम विद्यापीठाने पटकाविले प्रथम पारितोषिक
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटी आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या गणितीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत एमजीएम विद्यापीठात प्रथम वर्षात शिकणाऱ्या स्टीव्हन डिसल्वा या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याला स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्टीव्हन याने विभागीय गणितीय स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी त्याला सन्मानित करीत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना कुलपती कदम म्हणाले, एमजीएमचा विद्यार्थी स्टीव्हन याने विभागीय पातळीवरील स्पर्धेत आपले उत्कृष्ट देत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या क्षमतांना न्याय देत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. ही आम्हां सर्वांसाठी अभिमानाची बाब असून विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिलेले आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल स्टीव्हन याचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.एच.एच.शिंदे, विभागप्रमुख डॉ. आर. आर. देशमुख, विभागप्रमुख डॉ. गजानन लोमटे यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत विद्यापीठाच्या वतीने स्टीव्हन समवेत आकाश चौधरी आणि गौरव पडळकर यांनी सहभाग नोंदविला नोंदविला होता.
कोट :
एमजीएम विद्यापीठाने आणि माझ्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केले आणि या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळेच मी हे यश प्राप्त करू शकलो. माझी पुढील राज्यस्तरीय स्पर्धा लवकरच होणार असून तिथेही मी माझे उत्कृष्ट देत यशस्वी कामगिरी करेल, असा मला विश्वास वाटतो.
स्टीव्हन डिसल्वा,