एमजीएम विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना डी.लीट पदवी प्रदान
विद्यापीठाच्या १२८४ विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण
छत्रपती संभाजीनगर : आज आपणा सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. आपण या अपेक्षित उंचीवर कसे पोहचलो? हा प्रश्न स्वत:ला याक्षणी विचारायला हवा. आज आपण या उंचीवर पोहचला आहात यामध्ये आपले पालक आणि शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. आपल्यापैकी अनेकजण अपेक्षित उंचीवर पोहचल्यास आपल्याला या प्रवासात कोण मदत केली आहे, हे विसरून जातो. मात्र, आपल्या अपेक्षित उंचीच्या प्रवासात ज्यांनी – ज्यांनी आपल्याला सहकार्य केले आहे, अशा सर्वांना आपण विसरता काम नये. या प्रवासात मदतगार ठरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञतेचा भाव बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ, खासदार कपिल सिब्बल यांनी यावेळी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ आज ज्येष्ठ विधिज्ञ, खासदार कपिल सिब्बल यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या रुख्मिणी सभागृहात संपन्न झाला. यावेळी त्यांनी दीक्षांत भाषण करीत विद्यार्थ्यांना संबोधित केले. एमजीएम विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या १२८४ विद्यार्थ्यांना या वेळी पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी प्रास्ताविक करीत एमजीएम विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला तर कुलपती अंकुशराव कदम यांनी अध्यक्षीय समारोप केला.
एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. पी.एम.जाधव, डॉ.सुधीर कदम,डॉ.नितीन कदम, अमरदीप कदम,भाऊसाहेब राजळे, रणजीत कक्कड, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ.हरिरंग शिंदे, डॉ.प्राप्ती देशमुख, डॉ.रेखा शेळके, डॉ. जॉन चेलादुराई, प्रा.पार्वती दत्ता, डॉ. रणीत किशोर, डॉ. विजया मुसांडे, मुख्य वित्त अधिकारी भारत पेंटावार, डॉ.परमिंदर कौर, मुख्य वित्त लेखा अधिकारी राशी जैन, शुभा महाजन, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्वत परिषद, विविध प्राधिकारणीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे विभाग प्रमुख, संस्थांचे संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे आप्तस्वकीय, शिक्षक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार कपिल सिब्बल म्हणाले, मी निसर्गावर प्रेम करणारा एक निसर्गप्रेमी आहे. मी माझ्या आयुष्यात जे काही शिकलो आहे, ते सगळे निसर्गाकडून शिकलो आहे. आपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यास आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपण प्राण्यांच्या जगात गेल्यास आपल्याला हे समजते की, त्यांना भूक लागल्यानंतरच ते शिकार करतात. ते विनाकारण शिकार करीत नसून त्यामुळे आपली वने शाश्वत आहेत. आपण या शाश्वत निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकत असतोत. तसेच आपण सगळेजण नैसर्गिकरित्या वैविध्य जपणारे असून विविधता हा आपल्या जीवनाचा भाग आहे.
आज आपण नव्या जगात प्रवेश करीत आहेत. आपण आपले जीवन जगत असताना दररोज अनेक आव्हानांना सामोरे जात असतो. आपण जिथेही जाऊ तिथे आपण निर्णयांना आव्हान दिले पाहिजे. आव्हानांच्या अभावामध्ये बदल होऊ शकत नसून जग हे आव्हानांमुळे प्रगती करते. विचारातील नाविन्यता आणि नावीन्यपूर्ण उपायांनी प्रश्न सोडवले जाऊ शकतात. आपण जी प्रगती करू ती शाश्वत असायला हवी अन्यथा, झालेली प्रगती अधिक काळ टिकणार नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्यांनी या जगामध्ये क्रांती केलेलीअसून हेच आपण येणाऱ्या पिढ्यांना सांगणे आवश्यक असल्याचे खासदार कपिल सिब्बल यांनी यावेळी सांगितले.
कुलपती अंकुशराव कदम यावेळी बोलताना म्हणाले, आजच्या दिवशी ज्यांच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे, अशा एमजीएम विद्यापीठातील सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आपण खूप मोठे व्हा, खूप प्रगती करा! आजचा दिवस माझ्यासाठी आणि एमजीएम परिवारासाठी अभिमानाचा आहे. याचे कारण म्हणजे आजच्या दिवशी ज्येष्ठ आजीवन सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांचा डिलीट पदवी देऊन सन्मान करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले. ही पदवी स्वीकारल्याबद्दल मेधाताई आपले मनःपूर्वक आभार. मेधाताई यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. शेतकरी आदिवासी आणि गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.
एमजीएम विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी केलेली आहे. आज सर्वच क्षेत्रामध्ये विद्यापीठाने यशस्वीपणे प्रगती केलेली आहे. एमजीएम हे मराठवाड्यातील पहिले स्वयं अर्थसाहाय्यित खाजगी विद्यापीठ असून २०१९ पासून कार्यान्वित झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने एमजीएम विद्यापीठाला २ (एफ) दर्जा दिलेला आहे. येथे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मूलभूत आणि उपयोजित विज्ञान, व्यवस्थापन आणि वाणिज्य , सामाजिक विज्ञान आणि मानव्य विद्या, प्रयोगकला विद्याशाखा, आंतरविद्याशाखीय शिक्षण, फॅकल्टी ऑफ डिझाईन या विद्याशाखांतील विद्यार्थ्यानी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम आणि प्रतिभासंपन्न कामगिरी केली असल्याचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
दीक्षांत समारंभामध्ये एमजीएम विद्यापीठातून २०२३ -२०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या दीक्षांत समारंभात विद्यापीठातील ७ विद्याशाखांच्या पदवी –७६२, पदव्युत्तर पदवी – ३९९ , पदविका – ८३ , पदव्युत्तर पदविका – २७, विद्यावाचस्पती पदवी – ०३ आणि प्रमाणपत्र – ०४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी ३०६ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, ३९२ मूलभूत आणि उपयोजित विज्ञान, ३१९ व्यवस्थापन आणि वाणिज्य , १५६ सामाजिक विज्ञान आणि मानव्य विद्या, १० प्रयोगकला विद्याशाखा, ३१ आंतरविद्याशाखीय शिक्षण, ७० फॅकल्टी ऑफ डिझाईन विद्याशाखेचे विद्यार्थी होते. अशा विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या एकूण १२८४ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. तसेच या दीक्षांत समारंभात प्रथमच ३ विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी (पीएचडी) प्रदान करण्यात आली.
१० विद्यार्थी कुलपती सुवर्ण पदकाचे मानकरी
एमजीएम विद्यापीठाच्या वतीने तिसऱ्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील पदवीचे ५ आणि पदव्युत्तर पदवीच्या ५ अशा एकूण १० विद्यार्थ्यांना ‘चान्सलर्स गोल्ड मेडल’ देऊन गौरवण्यात आले. यामध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या विद्याशाखांमधून सर्वाधिक गुण प्राप्त केलेले आहेत. तसेच यावेळी स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेत सर्वाधिक गुण घेणाऱ्या वरद प्रशांत वर्मा या विद्यार्थ्याला प्राचार्य प्रताप बोराडे सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
१. तेजस बालाजी कल्लाळे (मूलभूत आणि उपयोजित विज्ञान)
२. धनश्री शिंदे (मूलभूत आणि उपयोजित विज्ञान)
३. क्षितिजा संजय कल्याणकर (व्यवस्थापन आणि वाणिज्य)
४. अदिती सुभाष राजगुरू (व्यवस्थापन आणि वाणिज्य)
५. सुधीर विजय कारले (आंतरविद्याशाखीय शिक्षण)
६. सृष्टी रविंद्र मोतीयाळे (सामाजिक विज्ञान आणि मानव्य विद्या)
७. खान मोहम्मद यसर अश्रफ खान (सामाजिक विज्ञान आणि मानव्य विद्या)
८. वैष्णवी शैलेश शास्त्री (अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान)
९. अमन विजय प्रताप सहाणी (अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान)
१०. भावना दिलीप वर्मा (फॅकल्टी ऑफ डिझाईन)
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना डी.लीट पदवी प्रदान
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल एमजीएम विद्यापीठाच्या वतीने त्यांना डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९५४ रोजी मुंबईत झाला. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून सामाजिक कार्यात एमए मिळवले. त्यांना अनेक आंदोलने आणि उपोषणे करीत असताना तुरुंगातही जावे लागले आहे. १९८५ मध्ये श्रीमती पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मोर्चे आणि रॅली काढण्यास सुरुवात केली आणि निषेध शांततापूर्ण वातावरणात आंदोलन केले. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ह्युमन राईट्स डिफेंडर्स अवॉर्ड, ग्रीन रिब्बन अवॉर्ड, छात्र भारती पुरस्कार, प्रभा पुरस्कार, बॅरिस्टर नाथ पै पुरस्कार आदि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
दीक्षांत समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.दीपा देशपांडे आणि प्रा.सरफराज अली कादरी यांनी केले. राष्ट्रगीताने दीक्षांत समारंभाचा समारोप करण्यात आला.०