एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल क्राईम सीन इन्वेस्टीगेशन’ स्पर्धेत यश
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या तन्वी अरोरा आणि ईतीप्रथम प्रसन्ना या विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल क्राईम सीन इन्वेस्टीगेशन कंपेटिशन’ या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक प्राप्त केले आहे. ही स्पर्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेची पहिली फेरी दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ तर अंतिम फेरी दिनांक ५ मार्च २०२४ रोजी शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था येथे संपन्न झाली. पहिल्या फेरीमध्ये १६० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. अंतिम फेरी १० स्पर्धकांमध्ये संपन्न झाली. एमजीएम विद्यापीठाच्या दोन संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग घेतला होता. यातील एका संघाने अंतिम स्पर्धेत स्थान मिळवीत दूसरा क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धकांना विभागप्रमुख डॉ. मोईनोद्दीन सिद्दिक्की यांनी मार्गदर्शन केले होते.
विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख व संचालक डॉ.अण्णासाहेब खेमनर यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.