एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीत निवड
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागातील सहा विद्यार्थ्यांची शापूरजी पालोंजी ग्रुप कंपनीत परिसर मुलाखतीतून निवड झाली असून या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. एमजीएममध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. विशेषत: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध आहे. आपले शिक्षण पूर्ण करीत असताना विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात परिसर मुलाखतींचे आयोजन करण्यात येते. आज या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी केले.
या परिसर मुलाखतीमध्ये आर्किटेक्चर विभागातील ६० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. मुलाखत दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांमधून सहा विद्यार्थ्यांची आंतरवासिता आणि नोकरीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना आंतरवासितेच्या ६ महिन्यांच्या कालावधीत दरमहा २५ ते ३० हजार पगार मिळणार असून ४.२५ लक्ष रुपये वार्षिक वेतन देण्यात येणार असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ परमिंदर कौर धिंग्रा यांनी यावेळी दिली.
निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, प्राचार्य डॉ हरिरंग शिंदे, उपप्राचार्या डॉ विजया मुसांडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ परमिंदर कौर धिंग्रा, सर्व विभागप्रमुख व सर्व संबंधितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!
या परिसर मुलाखतीसाठी विद्यापीठाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ परमिंदर कौर धिंग्रा, विभागीय समन्वयक प्रा सारंग नवल, आरती राऊलवार, सिमरन कौर व मोईज शेख यांनी परिश्रम घेतले.