एमजीएम विद्यापीठाची सीईटी होणार १६, १७ व १८ मे रोजी
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाची विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता पूर्व परीक्षा दिनांक १६, १७ आणि १८ मे २०२४ रोजी विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून यासाठी विद्यापीठाच्या www.mgmu.ac.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यापीठाकडून तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रवेश पात्रता परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, अभियांत्रिकी व्यतिरिक्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आणि डिझाईन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा आदींचा समावेश होतो. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता परीक्षा शनिवार, दिनांक १८ मे २०२४ रोजी होणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजिन्स, रोबोटिक्स, डेटा सायन्स, इन्फर्मेशन टेकनॉलॉजी, कॅम्पुटर सायन्स, सिव्हिल, मेकॅनिकल अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश होतो.
अभियांत्रिकी व्यतिरिक्त अभ्यासक्रमांसाठी होणारी प्रवेश पात्रता परीक्षा दिनांक १६ व १७ मे २०२४ रोजी होणार आहे. यामध्ये पदवी बीए, बीकॉम, बी एससी, बीसीए, बीबीए तर पदव्युत्तर पदवी एमए, एमसीए, एमबीए, एमएससी आदि अभ्यासक्रमांच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पत्रकारिता, फॉरेन्सिक सायन्स, बायो टेकनॉलॉजी, संगीत, चित्रपट, फोटोग्राफी, नाट्यशास्त्र, कॉमर्स, हॉटेल मॅनेजमेंट, फाईन आर्ट, मॅनेजमेंट, बायो इन्फॉर्मटिक्स, ऍनिमेशन, मॅथेमॅटिक्स, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गांधीयन स्टडीज, लिगल स्टडीज, फार्मास्युटिकल सायन्स इ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा होणार आहे.
एमजीएम विद्यापीठ हे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे उच्च शैक्षणिक मूल्य जपत महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारे विद्यापीठ आहे. विद्यापीठातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. दरवर्षी विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेल्या परिसर मुलाखतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
या पात्रता परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी ९०६७६१२००० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
एमजीएम विद्यापीठ आपली उच्च शैक्षणिक गुणवत्ता जपत कायम विद्यार्थी केंद्रित धोरणे राबवित आले आहे. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ कायम प्रयत्नशील असून या सीईटी परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एमजीएम विद्यापीठात प्रवेशाचे द्वार खुले होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा !
कुलगुरू डॉ विलास सपकाळ, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर