एमजीएम विद्यापीठाच्या लघुपटांचा देवगिरी शॉर्टफिल्म महोत्सवात गौरव
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फिल्म आर्ट्सच्या ‘द डील’ आणि ‘अनसिन ट्रॅप’ या लघुपटांचा देवगिरी शॉर्टफिल्म महोत्सवात गौरव करून दिग्दर्शकांना सन्मानित करण्यात आले. देवगिरी चित्रसाधना आयोजित तिसऱ्या देवगिरी शॉर्टफिल्म महोत्सवामध्ये एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स द्वारा निर्मित आणि लक्ष्मण बिच्चेवार दिग्दर्शित ‘द डील’ या लघुपटाला उत्कृष्ट कॅम्पस फिल्म आणि सौरभ कांबळे दिग्दर्शित ‘अनसिन ट्रॅप’ लघुपटाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण बिच्चेवार आणि दिग्दर्शक सौरभ कांबळे यांच्या लघुपटाचा देवगिरी शॉर्टफिल्म महोत्सवात गौरव होणे ही आम्हां सर्वांसाठी आनंदाची बातमी असून स्कुल ऑफ फिल्म आर्ट्सचे विद्यार्थी कायम दर्जात्मक काम करीत आले आहेत. फिल्म स्कूलने अल्पावधीत आपले नावलौकिक कमावले असून येत्या काळामध्ये येथील विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव करतील, असा विश्वास कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, विभागप्रमुख प्रा. शिव कदम यांनी दोन्ही दिग्दर्शकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.