एमजीएम फिजिओथेरपी महाविद्यालयाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाने जागतिक बाल शोषण प्रतिबंध दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘ एमजीएम मॅरेथॉन २०२३’ चे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. आज एमजीएम द्योतन सभागृहात झालेल्या समारंभ सोहळ्यात एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या रेखा सिंग यांनी प्रमाणपत्र आणि मेडल देऊन फिजिओथेरपी महाविद्यालयाला सन्मानित केले. यावेळी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या रेखा सिंग, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, प्राचार्य प्राचार्य सरथ बाबू, प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी, करण बिल्डरचे संचालक प्रमोद सूर्यवंशी, प्राध्यापक, धावपट्टू, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या रेखा सिंग म्हणाल्या, एमजीएम नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित आलेले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपण या उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीने एक आदर्श निर्माण केला आहे. एमजीएम हे स्वत: चे रचलेले विक्रम मोडत नवीन विक्रम प्रस्थापित करणारी संस्था आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स झाले आता आपण जागतिक पातळीवर विक्रमासाठी सज्ज व्हाल, या विश्वासासह आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
आपल्या महाविद्यालयाचे नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविले जाणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असून काही दिवसांपुर्वी आपण केलेल्या उत्कृष्ट कार्याचा हा सन्मान आहे. एमजीएम आपल्या कार्यातून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेले असल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा यांनी यावेळी सांगितले.
प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी यावेळी बोलताना म्हणाल्या, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाने आजतागायत १५ शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना बाल शोषणासंदर्भात जागृत केले आहे. बाल शोषण प्रतिबंधात्मक उपक्रमात आतापर्यंत सुमारे ५० हजारांवून अधिक नागरिकांनापर्यंत आम्ही पोहचू शकलो आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आम्ही कायम आमची समाजिक बांधिलकी जपत यापुढेही हे जनजागृतीचे काम सुरू ठेऊ.
एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्यावतीने बाल शोषण प्रतिबंध जागतिक दिनाचे औचित्य साधून बालकांचे विविध प्रकारे होणाऱ्या बाल शोषणास प्रतिबंध करण्याकरिता त्याचप्रमाणे या संदर्भात समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘एमजीएम मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येते. शाळा, संस्था, महाविद्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून ‘बालशोषण थांबवा’ चा संदेश देत या मॅरेथॉनने आपला २४६ कि.मी. प्रवास छत्रपती संभाजीनगर ते पुणे २७ तासात पूर्ण करीत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती घनाचरी यांनी तर आभार प्रदर्शन पायल ढवळे यांनी मानले. यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.