एमजीएम मॅरेथॉन उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याच्या दिशेने मार्गस्थ
बाल शोषण प्रतिबंध जागतिक दिनानिमित्त आयोजित एमजीएम मॅरेथॉनला सुरूवात
छत्रपती संभाजीनगर, दि.२३ : बाल शोषण प्रतिबंध जागतिक दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी मिशनच्या इंस्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एमजीएम मॅरेथॉन २०२३’ ला आज विद्यापीठाच्या चिंतहगाह परिसरात हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या मॅरेथॉनच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.अपर्णा कक्कड, अधिष्ठाता डॉ.राजेंद्र बोहरा, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई, प्राचार्य सरथ बाबू, प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी, विद्यार्थी, धावपट्टू व सर्व संबंधित उपस्थित होते.
या दोन दिवसीय जनजागृतीपर मॅरेथॉनची सुरूवात आज सकाळी ७ वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाली असून ही मॅरेथॉन गंगापूर रोड, शनीशिंगणापुर रोड, अहमदनगर, शिरूर, शिक्रापुर या मार्गे गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ दुपारी १ : ३० वाजता महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे पोहचणार आहे. या मॅरेथॉन दरम्यान एमजीएम परिसर, क्रांती चौक, वाळूंज, गंगापुर रोड, नेवासा, शनीशिंगणापुर, शिक्रापुर आणि महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.बाल शोषण प्रतिबंध जागतिक दिनाचे औचित्य साधून बालकांचे विविध प्रकारे होणाऱ्या बाल शोषणास प्रतिबंध करण्याकरिता त्याचप्रमाणे या संदर्भात समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी या ‘एमजीएम मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येते. मॅरेथॉनची सुरूवात एमजीएम विद्यापीठ परिसर, छत्रपती संभाजीनगर पासून होऊन शेवट महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे होणार आहे. मॅरेथॉनचे अंतर २४६ कि.मी. असून यामध्ये सुमारे १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. ‘बालशोषण थांबवा’ चा संदेश देत ही मॅरेथॉन ३२ तासांचा आपला प्रवास सुमारे १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांच्या साक्षीने पूर्ण करणार आहे.
पुणे येथे ‘एमजीएम मॅरेथॉन’ पोहचल्यानंतर संपन्न होणाऱ्या सांगता समारंभास महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, करण बिल्डरचे संचालक प्रमोद सूर्यवंशी व सर्व संबंधित उपस्थित असणार आहेत.