जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘राजमताझ २०२५’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजचे बहुचर्चित वार्षिक स्नेहसंमेलन ‘राजमताझ – २०२५’ चे उद्घाटन जेएनईसी लॉन्स येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी, शशिकला बोराडे, इंडिया अँड साऊथ ईस्ट एशिया डॅनोन कंपनीचे ऑपरेशन्स डायरेक्टर संदीप बोरळकर, लँडमार्क कन्सेप्ट्स प्रा लि च्या व्यवस्थापकीय संचालिका कमल राव तर एमजीएम विद्यापीठाकडून कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, प्राचार्या डॉ विजया मुसांडे, राजमताझच्या समन्वयिका प्रा डॉ दीपा देशपांडे, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
आजच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ विजया मुसांडे यांनी केले. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. राजमताझ मध्ये उद्या, शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी कॅरेक्टर डे, फन गेम्स, भरारी (फोटोग्राफी, रील मेकिंग), मुशायरा, डान्स अँड इन्ट्रुमेंटल, ड्रामा, पर्सनालिटी कंटेस्ट आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
एमजीएमच्या सर्वंकष विद्यार्थी विकासाच्या कटिबद्धेतून जेएनईसी अभ्यासासोबतच अभ्यासपूरक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांची जी एक आगळीवेगळी संस्कृती बनली आहे त्याचा मानबिंदू म्हणजेच ‘राजमताझ’ मानले जाते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘राजमताझ’च्या आयोजनात काहीसा खंड पडलेला होता. मात्र, यावर्षीपासून ४० वर्षाची परंपरा जपत राजमताझ’चे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन सोहळा पार पडला.