देवगिरी महाविद्यालयात समाजशास्त्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय समाजशास्त्र विभागातील स्नेहल खंडागळे ही विद्यार्थीनी एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून पीएसआय झाली तर आचल विश्वकर्मा, स्वाती बडक आणि सुयोग जोशी या विद्यार्थिनी सेट परीक्षा पास झाल्या. या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समाजशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. तसेच एम ए समाजशास्त्र प्रथम वर्षाला प्रवेशित झालेल्या विद्यार्थांचा स्वागत समारोह आयोजित करून या विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुणवंत विद्यार्थांचा सत्कार या कार्यक्रमात घेण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे जेष्ठ सदस्य पंडितराव हर्षे, माजी मंत्री अनिल पटेल, विवेक जैस्वाल, प्राचार्य अशोक तेजनकर व विभाग प्रमुख डॉ दिलीप खैरनार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. नियमित वर्ग केल्यामुळे व समाजशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
समाजशास्त्र विभागांतर्गत सेट, नेट, जेआरएफ या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण चांगले असून विभागातील साठपेक्षा अधिक विद्यार्थी विविध विद्यापीठ व महाविद्यालयांतर्गत प्राध्यापक म्हणून महाराष्ट्रभर काम करीत आहेत. त्याच बरोबर विभागातील संशोधन केंद्रांतर्गत आजपर्यंत पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थांनी पीएच डी ही पदवी प्राप्त केली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ दिलीप खैरनार यांनी विभागाच्या वाटचालीचा आढावा घेऊन सदर वाटचालीत गुणवंत विद्यार्थ्यांनी सातत्याने यश संपादन केल्यामुळे देशभर समाजशास्त्र विभाग नावारूपास आला आहे. तसेच नवीन विद्यार्थांनी भविष्यात कशी वाटचाल करायची याबाबतही मार्गदर्शन केले.
विभागातील सहा विद्यार्थी हे युपीएससी परीक्षेची तयारी करीत असून त्यातील चार विद्यार्थीनी दोन वेळेस युपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत वाटचाल केली. परंतु त्यांना अपयश आले. पुढील काळात अपयशाचे रुपांतर यशामध्ये होण्यासाठी विद्यार्थांना महाविद्यालयाकडून ग्रंथ सुविधा, मोफत मार्गदर्शन तसेच त्यांना आर्थिक मदतही केली जाईल असे त्यांनी आश्वासित केले. विभागातील प्राध्यापकांच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविले असून अशा विद्यार्थांचा सत्कार करून इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे ही या कार्यक्रमा मागची भूमिका आहे.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ परसराम बचेवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा सुरज गायकवाड आणि डॉ शुभांगी मोहोड यांनी प्रयत्न केले.