राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मेघे ग्रुप ऑफ स्कूलचा विविध पदांकरिता ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’
विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मेघे ग्रुप ऑफ स्कूलच्या वतीने शिक्षकांच्या विविध पदांकरिता प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला. विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित प्लेसमेंट ड्राईव्ह गणित विभागातील रामानुजन ऑडिटोरियममध्ये शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी पार पडला.
विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, पदव्युत्तर गणित विभाग प्रमुख डॉ गणेश केदार, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन, बेलतरोडी येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या प्राचार्य उमा भालेराव, एमजीएस ग्रुपचे एचआर के एस सजित यांची यावेळी उपस्थिती होती. प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी मुलाखतीला उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रयत्नातूनच यश मिळते असे सांगितले. मुलाखतीत आपणास यश आले नाही तर निराश होऊ नका. विद्यापीठाच्या वतीने अशा प्रकारचे रोजगार मेळावे वारंवार आयोजित केले जातात. त्यामुळे मुलाखतीत निवड न झालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा जोमाने तयारी करावी, असे डॉ काकडे म्हणाले.
यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. मेघे ग्रुप ऑफ स्कूलच्या वतीने प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक तसेच पदव्युत्तर पदवी शिक्षकांची पदे भरली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, धामणगाव, वर्धा, हिंगणघाट आणि वरुड येथील शाळांवर रुजू केले जाणार आहे. याकरिता गणित, सांख्यिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयात एमएससी तसेच इंग्रजी आणि समाजशास्त्र विषयातून एमए पदवीधारक २०२४ मधील उत्तीर्ण तसेच २०२५ मधील अपियर विद्यार्थी या मुलाखतीकरिता पात्र होते.
प्राथमिक शिक्षकांना प्रतिमाह २२ हजार रुपये, प्रशिक्षणार्थी पदवी शिक्षक व पदव्युत्तर पदवी शिक्षकांना प्रतिमाह ३० ते ३५ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. विविध पदांकरिता जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची सुरुवातीला चाळणी परीक्षा घेण्यात आली. चाळणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेत निवड केली जाणार आहे. एमजीएस ग्रुपच्या एचआर विभागातील अमन साहू, दर्शना शेलमवार, तुषार बोरनारे यांनी रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.