उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात CADP चा आढावा घेण्यासाठी सुकाणू व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत नंदुरबार जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या ‘सिलेज बेसड् एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP)’ चा आढावा घेण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष व सुप्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू व नियंत्रण समितीची बैठक बुधवार दि ३ एप्रिल रोजी विद्यापीठात झाली.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या वतीने ‘सिलेज बेसड् एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP)’ राबविणेसाठी निधी देण्यात आला आहे. खेडी आणि शहरे यांच्यातील दरी कमी करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान वर आधारीत प्रक्रिया म्हणजेच सिलेज. यामध्ये शिक्षण, तंत्रज्ञान आणि कामाची संधी ही गावातील क्षमता लक्षात घेवून पर्यावरण पूरक अशी असणार आहे. विविध प्रकारचे उपक्रम नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्र आणि बायफ, पुणे यांच्या सहकार्याने विद्यापीठामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील काही गावामध्ये राबविले जात आहेत. या राबविल्या जाणाऱ्या कामांचा आढावा डॉ काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ माहेश्वरी यांनी विद्यापीठाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. कृषी, उत्पादन आणि सेवा हे तीन क्षेत्र एकत्र येवून खेड्यांमध्ये काम केले गेले तर खेड्यातील स्थलांतर होणार नाही. त्यासाठी ग्रामीण भागात इको सिस्टीम निर्माण करण्याची गरज आहे. अशी भावना डॉ काकोडकर यांनी यावेळी बोलून दाखविली. समन्वयक डॉ किशोर विश्वकर्मा यांनी या उपक्रमांतर्गत सुरु असलेल्या व भविष्यात घेण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.
यावेळी आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ तुषार माळी, आयोगाचे सदस्य सचिव डॉ एन जी शहा, डॉ भारती भालेराव, डॉ ए व्ही सप्रे, प्रा बी आर रोंगे, डॉ प्रगती गोखले, डॉ राजेंद्र दहातोंडे, डॉ जयंत उत्तरवार, स्वप्नील गिऱ्हाडे, प्रा भूषण चौधरी, डॉ दिनेश जगताप, डॉ के एफ पवार, डॉ एच एल तिडके, डॉ नवीन दंदी, डॉ जे पी बंगे, गणेश पाटील, निलेश चव्हाण हे उपस्थित होते.