मुक्त विद्यापीठात परिभाषाकोश निर्मिती विषयी तज्ज्ञ समितिची बैठक संपन्न
“ज्ञान निर्मितीचे स्त्रोत समृद्ध करण्याचे महत्त्वाचे कार्य
वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोगाच्या माध्यमातून होत आहे“.
कुलगुरू प्रा संजीव सोनवणे
नाशिक : वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोग (सी एस टी टी) शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ग्रंथालय आणि माहिती स्त्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने (मराठी- इंग्रजी-हिंदी) भाषेमध्ये ग्रंथालय आणि माहिती शास्त्रातील वैज्ञानिक आणि तांत्रिक परिभाषाकोश निर्मिती विषयी तज्ज्ञ समितिच्या बैठकीचे दिनांक १७ ते २१ जून २०२४ या कालावधीत ग्रंथालय आणि माहिती स्त्रोत केंद्र येथे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या निमित्ताने कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी उपस्थित तज्ज्ञ समिती सदस्यांच्या सोबत संवाद साधला. “ज्ञान निर्मितीचे स्त्रोत समृद्ध करण्याचे महत्त्वाचे कार्य वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोगाच्या माध्यमातून होत आहे”, याबाबत त्यांनी कौतुक केले. रोज एक नवा शब्द समजला तर आपल्याला वर्षाला ३६५ नवे शब्द समजतील.
या प्रकारचे परिभाषाकोश आणि शब्दावली निर्मिती करताना दूरशिक्षणाची शब्दावली देखील आयोगाने तयार करावी असे प्रा संजीव सोनवणे यांनी सुचविले. यासाठी आयोगाला विद्यापीठाचे सहकार्य असेल. तसेच जर शब्दावली आयोगाला या बाबत काहीही मदत लागली तर या प्रकारचे उपक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून करता येतील असेही सुचविले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रकाश बर्वे प्रमुख, ग्रंथालय यांनी केले, तर आयोगाच्या कार्याबद्दल डॉ अशोक सेलवटकर नियंत्रण अधिकारी (शैक्षणिक) यांनी माहिती दिली. यावेळी परिभाषाकोश आणि शब्दावली निर्मिती समिती सदस्य प्रा राजेंद्र कुंभार, वरिष्ठ प्राध्यापक ग्रंथालय व माहिती शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, प्रा सुभाष पी चव्हाण, संचालक ज्ञान स्त्रोत केंद्र एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबई, डॉ एन बी दहिभाते, सेवानिवृत्त मुख्य ग्रंथपाल, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला, पुणे, डॉ दत्तात्रेय काळबांडे, जे वातुमुल साधुबेला गर्ल्स कॉलेज, उल्हासनगर-ठाणे, डॉ संभाजी पाटील, एम ई टी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, डॉ रेणुका चव्हाण, शैक्षणिक संयोजक (हिंदी) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, डॉ सायली आचार्य, एस एम आर के कॉलेज, नाशिक तसेच मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे संचालक नागार्जुन वाडेकर, लेखक दत्ता पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, दृक श्राव्य विभागाचे अधिकारी, ग्रंथालयाच्या स्मिता सोनसळे, किशोर मोरे, विजय धुमणे, किरण जाधव व कर्मचारी उपस्थित होते. डॉ प्रकाश बर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.