लोकशाही टिकवण्यासाठी माध्यमांची जागरूकता गरजेची – गिरीश कुबेर
देवगिरी महाविद्यालयाच्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीचा गाभा युरोपियन प्रबोधनकाळात जन्माला आला. लोकशाही व्यवस्था ही मूल्यवर्धित व्यवस्था असून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये लोकशाहीमध्ये दडलेली आहेत. ही लोकशाहीची मूल्ये आपल्या रक्तात बिंबवली गेली पाहिजेत. लोकशाही हेच जगण्याचे तत्व झाले पाहिजे. आपल्याला तत्त्वासाठी, विचारासाठी प्राण देणारी लोकशाही हवी आहे. लोकशाहीमध्ये संस्थात्मक व्यवस्थांचा आदर केला पाहिजे. लोकशाही ही विचारांची लढाई असते, विचारांसाठी विचारांचा संघर्ष करावा लागतो. ज्या प्रांतात विचारांची सकस एकता नसते तो प्रांत किंवा त्या प्रांतात लोकशाही समृद्ध होत नसते. ज्या लोकशाहीमध्ये नियमाचा आदर केला जातो, नियम पाळले जातात. नियम पाळण्यासाठी असतात अशी धारणा निर्माण होते, हा सांस्कृतिक लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही सशक्तपणे टिकवण्यासाठी माध्यमे टिकणे गरजेचे आहे. न दिसणारी बाजू दाखविणे ही माध्यमाची भूमिका असली पाहिजे तसेच व्यवस्थेचे, विचारांचे विच्छेदन करणे हे माध्यमांचे कार्य आहे. असे प्रतिपादन गिरीश कुबेर यांनी केले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय येथे फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाला 2023 वर्ष 33 वे या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गिरीश कुबेर यांनी गुंफले. ‘लोकशाही, विचारस्वातंत्र्य व प्रसारमाध्यमे’ या विषयावर ते बोलत होते. या तिसऱ्या पुष्पाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर हे होते. पुढे बोलताना गिरीश कुबेर म्हणाले की, चांगल्या लोकशाहीत नियमांचे आणि तत्त्वांचे पालन करण्याची मोठी जबाबदारी असते. वर्तमान काळात माध्यमांची व्याप्ती वाढायला हवी आणि माध्यमांवर वाचकांचे, प्रेक्षकांचे नियंत्रण असायला हवे, ते तटस्थ असायला हवे. विचार स्वातंत्र्यावर बोलताना ते म्हणाले की, आपला विचार हा लोकशाही तत्त्वांचा आदर करणारा असावा. महाराष्ट्रातील प्रबोधन हे युरोपच्या प्रबोधनाशी नाळ सांगणारे असून महाराष्ट्राने बौद्धिक चिकित्सा करण्याची परंपरा देशाला दिली असेही ते म्हणाले. पत्रकारितेत मोठा धोका मनोरंजकीयकरणाचा व विद्रुपिकरनाचा आहे. माध्यमांना पण उत्तरदायित्व असायला हवे तसेच वाचकांना देखील पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. प्रश्न विचारणे ही चांगल्या माध्यमाची ओळख आहे. वर्तमानामध्ये माध्यमांची तटस्थता ही अत्यंत महत्त्वाची आहे. असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर यांनी केला. व्याख्यानमालेसाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य ऍड. सुखदेव शेळके, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर, व्याख्यानमालीचे समन्वयक डॉ. गणेश मोहिते, उपप्राचार्य प्रो दिलीप खैरनार, उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विजय नलावडे, प्रा. सुरेश लिपाने, प्रा. नंदकुमार गायकवाड व महाविद्यालयातील प्राध्यापक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, साहित्यिक, विचारवंत व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय, सूत्रसंचालन व आभार समन्वयक डॉ. गणेश मोहिते यांनी केले.