संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शहीद दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
सामाजिक क्रांतीमधून राजकीय क्रांती घडविण्याचे भगतसिंह यांचे ध्येय होते – प्रा ज्ञानेश्वर गटकर
अमरावती : सामाजिक क्रांतीमधून भगत सिंह यांना राजकीय क्रांती घडवायची होती, मात्र क्रांतीचा अर्थ त्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातूनच शोधला होता, त्यांना रक्तरंजीत क्रांती मान्य नव्हती, अशा आशयाचे प्रतिपादन प्रा ज्ञानेश्वर गटकर यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने शहीद दिनानमित्त डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर याप्रसंगी अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ तुषार देशमुख, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ व्ही एम मेटकर,अविनाश बोर्डे, अधिसभा सदस्य कैलास चव्हाण, नितीन टाले, भगत सिंह यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकाचे लेखक ओम पाखरे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना प्रा गटकर म्हणाले, भगत सिंह यांची क्रांतिकारी संघटना जरी होती, परंतु रक्तरंजित आणि व्यक्तीगत सूड अशा भावनांना त्यात स्थान नव्हते, तर बुध्दीप्रामाण्यवाद, शोषणाविरुध्दचा त्यांच्या क्रांतीचा लढा होता व तो त्यांनी वयाच्या अगदी दहाव्या वर्षापासूनच संघटना उभी करुन उभारला. त्यांच्या कुटुंबियांपासूनच त्यांना चळवळीची प्रेरणा मिळाली होती, त्यांचे कुटुंब राष्ट्रभक्तीसाठी चळवळीत होते. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रज अधिका-याला ठार केले होते. मात्र त्यात त्यांना इंग्रज सरकारने अटक केली आणि 23 मार्च रोजी लाहोर येथील तुरुंगात त्यांना फाशी दिली. मात्र त्याहीवेळी त्यांच्यात राष्ट्रभक्ती ठासून भरली होती. त्यांनी शेवटच्या घटकेत असतांना इन्क्लाब जिंदाबाद हे त्यांच्या आईने दिलेले वचन पूर्ण केले.
भगतसिंह यांचा तरुणांवर प्रचंड विश्वास होता व त्यांनी तरुणांमध्ये त्यावेळी मोठ्या प्रमाणात चेतना जागविली. भगतसिंह यांच्या क्रांतिकारी लढ्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन देखील याप्रसंगी प्रा गटकर यांनी केले. भगत सिंह यांच्या जीवनचरित्रावर पुस्तक लिहिणारे ओम पाखरे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. व्याख्यान कार्यक्रमाचे समारोपीय भाषण व्यवस्थापन परिषद सदस्य अविनाश बोर्डे यांनी केले. संचालन प्रतिक्षा ढोके हिने, तर आभार अधिसभा सदस्य कैलास चव्हाण यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमरावती विद्यापीठात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा ‘शहीद दिन’ संपन्न
23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पाळण्यात आला. याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य युध्दातील योध्दा तसेच थोर क्रांतीकारक भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांचा शहीद दिन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात संपन्न झाला.
याप्रसंगी कुलसचिव डॉ तुषार देशमुख यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. शहीद भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्याबद्दल विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी माहिती दिली. शहीद दिन कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.