गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी साहित्याचा समावेश


गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार आपल्या सर्व विद्याशाखा आणि विषयांचे अभ्यासक्रम तयार केले आहेत. संबंधित विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांच्या अखत्यारीतील विविध अभ्यास मंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांनी हे अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार केले आहेत. मानव विज्ञान विद्याशाखेत, ‘मराठी साहित्याचे स्वरूप’ या ग्रंथाचा मराठी भाषेच्या मुख्य अनिवार्य विषय म्हणून समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, मराठीला खुले वैकल्पिक (OE), VSC, ACE, FP तसेच MEJAR विषयांमध्येही समाविष्ट केले आहे.

मराठी भाषा शिकवताना साहित्याचा समावेश करणे पूर्णपणे योग्य आहे, कारण कोणतीही भाषा साहित्यानेच समृद्ध होते. विद्यापीठाने खुल्या वैकल्पिक विषयांतर्गत ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक, आधुनिक मराठी कवितांच्या संपादित ग्रंथातील पाच निवडक कवींच्या कविता आणि प्रवासवर्णनासारखे अनेक साहित्यिक प्रकार सैद्धांतिक स्तरावर आणि प्रत्यक्ष कलाकृतींच्या माध्यमातून सादर केले आहेत.

गोंडवाना विद्यापीठ कायम विद्यार्थी हिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार करत असून याच सकारात्मक भूमिकेतून विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी संबधित अभ्यासक्रमाच्या अभ्यास मंडळाची तातडीची बैठक घेतली व अभ्यासक्रमासंदर्भात सूचनावजा आदेश दिले. आता पदवी अभ्यासक्रमात आवश्यक मराठी व मराठी साहित्य हे दोन्ही विषय याच सत्रापासून समाविष्ट करण्यात येणार असून याचा लाभ आता चालू सत्रातील प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र व द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रापासूनच विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान
गोंडवाना विद्यापीठ स्थानिक संस्कृती, कला, इतिहास आणि भाषांच्या संवर्धनात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. साहित्याच्या क्षेत्रात, विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांत दोन युवा साहित्य संमेलने आणि एक झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे आयोजित केले आहे. गेल्या चार वर्षांपासून, विद्यार्थ्यांच्या कला आणि साहित्यिक विकासासाठी ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. मागील वर्षी मराठी भाषा पंधरवड्यादरम्यान, नाट्यलेखन कार्यशाळा आणि मराठी विश्वकोश लेखन कार्यशाळांसारखे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

साहित्य आणि कलेबद्दल विद्यापीठाची भूमिका नेहमीच सकारात्मक आणि प्रेरणादायी राहिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने निश्चित केलेल्या निकषांनुसार संबंधित घटकांनी अभ्यासक्रम तयार केले असल्यामुळे, मराठी साहित्याबद्दल कोणत्याही पूर्वग्रहाचा प्रश्नच उद्भवत नाही. मराठी भाषेच्या विषयात इतर कोणत्याही ललित कलाकृती किंवा घटक समाविष्ट करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य अभ्यास मंडळांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com