प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा – डॉ. सय्यद एच. के.
मिल्लिया महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
बीड : येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक 14 ते 28 जानेवारी 2024 निमित्त “महाविद्यालयीन प्रशासनामध्ये मराठीचा वापर” याविषयी दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, प्रमुख वक्ते डॉ. सय्यद एच.के. उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस.एस, हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर मिर्झा असद बेग, उर्दू विभाग प्रमुख तथा पदव्युत्तर संचालक प्रा.फरीद अहमद नेहरी, इंग्रजी विभाग प्रमुख तथा नॅक समन्वयक डॉ.अब्दुल अनीस, अरेबिक विभाग प्रमुख डॉ. अब्दुल समद यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ.अब्दुल अनीस यांनी केले. त्यांनी मराठी भाषा व साहित्याचा विकास याबद्दल माहिती दिली. मराठी समृद्ध भाषा असल्यामुळे भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही तिसरी भाषा आहे व आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे असे सांगितले. प्रमुख वक्ते डॉ.सय्यद एच.के. यांनी मराठी भाषा ही खूप सुंदर भाषा आहे व आपल्या महाराष्ट्राची मायबोली आहे तिच्यात वात्सल्याचे व संस्काराचे बोल आहेत. मराठी भाषा जरी रांगडी वाटत असली तरी तिच्यामध्ये एक आपलेपण जाणवते. प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा तसेच भाषा व्यक्तीमध्ये योग्य संस्कार निर्माण करते. केवळ आपल्या बोलण्यातून नव्हे तर आचार-विचारातून मराठी भाषा दिसायला हवी. जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत आपण सर्वांनी मराठीचा जागर करून, तिचे संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. तसेच महाराष्ट्रशासनाने असे ठरवले आहे की सर्वच कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक उपयोग व्हावा असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांनी प्रत्येकाने भाषेचा सन्मान करावा, मराठी भाषेच्या विकासासाठी दैनंदिन व्यवहारात जास्त वापर करावा. मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अब्दुल अनीस यांनी तर आभार उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस.एस. यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.