अमरावती विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त परिसंवाद संपन्न
सोशल मिडीयाचा विवेकपूर्ण आणि कल्पक उपयोग वाचन संस्कृतीला पोषक ठरू शकतो – प्रा. हेमंत खडके
अमरावती : सोशल मीडियामुळे वाचन कमी झाले असे समजले जात असले तरी या माध्यमात वाचन संस्कृतीला पूरक ठरणाऱ्या अनेक बाबी आहेत. अलीकडच्या काळात गाजत असलेल्या अनेक पुस्तकांची निर्मिती ही सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमधून झाल्याचे दिसते. ‘भुरा’ हे प्रा. शरद बाविस्कर यांचे आत्मकथन याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.या आत्मकथनातील काही प्रकरणे ही सुरुवातीला फेसबुकवर लिहिली गेलेली आहेत. काही पुस्तकप्रेमींनी सुरू केलेल्या समूहांमध्ये,सदस्य वाचलेल्या-आवडलेल्या पुस्तकांचे फोटो, त्यांविषयीची संक्षिप्त माहिती, प्रकाशक आणि इतर माहिती पोस्ट करत असतात.
अशा पोस्टवर त्या पुस्तकांच्या गुणदोषांची चर्चा रंगत असते. मते व्यक्त होताना, अनेकदा वाद-प्रतिवादही होतात. हा सोशल मीडियाचा अतिशय प्रभावी उपयोग आहे, असे प्रतिपादन प्रा. हेमंत खडके यांनी केले. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय, पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती व श्रीशिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२४ च्या निमित्ताने ‘सोशल मीडियाचा वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित परिसंवादात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. वक्ते म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त संजय पवार व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या ग्रंथपाल डॉ. रेवती खोकले यांनी सहभाग नोंदविला.
आजच्या मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत चालले आहे. पूर्वी विद्यार्थ्यांमध्ये जशी वाचनाची आवड होती, तशी आवड आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. आज पुस्तके वाचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी कमी होत चालली आहे. साहित्य संमेलनामध्ये पुस्तकांची विक्री कमी होऊ लागली आहे. पूर्वी गजबजणारी वाचनालये आता ओस पडू लागली आहेत. ग्रंथालयातील पुस्तके वर्षानुवर्षे एका जागेवरून हलत नाहीत. सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे विद्यार्थी अवांतर वाचन विसरत चालले आहेत, असे प्रतिपादन उपायुक्त संजय पवार यांनी यांनी केले.
वाचन ही जीवनाला उन्नत करणारी बाब आहे. यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलवण्यात वाचनाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करायला हवे. मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात रमले पाहिजे. चांगल्या पुस्तकांचा, विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेला माणूस हत्या, आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतो. असे निरीक्षण ग्रंथपाल डॉ. रेवती खोकले यांनी नोंदविले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. सुवर्णा गाडगे यांनी केले. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे, डॉ. वर्षा चिखले, डॉ. माधव पुटवाड, डॉ. प्रणव कोलते, तहसिलदार संतोष काकडे यांच्यासह विद्यार्थ्यांची व मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.