नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्रात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा
महानुभावांनी अफगाणिस्तानपर्यंत मराठी भाषा पोहचवली – डॉ म रा जोशी
आचार्य नागदेवांनी मराठी भाषेतील पहिले भाषासंवर्धक – भारतभूषण शास्त्री
नागपूर : अफगाणिस्तानपर्यंत मराठी भाषा पोहचवणारा एकमेव संप्रदाय हा महानुभाव संप्रदाय आहे, मराठी भाषा संवर्धनात महानुभाव संप्रदायाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे विचार डॉ म रा जोशी, नागपूर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन व गांधी विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त ‘वारसा महानुभाव साहित्याचा’ हा अभिनव उपक्रम शनिवार, दि १८ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. यावेळी डॉ जोशी मार्गदर्शन करीत होते.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन प्रमुख प्रा भारतभूषण शास्त्री यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ म रा जोशी (नागपूर), डॉ राष्ट्रपाल मेश्राम यांची उपस्थिती होती. ‘मराठी भाषा संवर्धनात महानुभाव संप्रदायाची भूमिका’ या विषयावर पुढे बोलताना डॉ म रा जोशी यांनी भारत वर्षाच्या इतिहासात एकाच भाषेत अनेक लिप्या तयार करण्याचे असामान्य कार्य महानुभाव संप्रदायाने केले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी डॉ राष्ट्रपाल मेश्राम यांनी विचार व्यक्त करताना मराठी भाषेतील मुळ शब्द शोधण्यासाठी महानुभाव साहित्याचा आधार घ्यावा लागतो, असे सांगितले. महानुभाव साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय मराठी साहित्याचा अभ्यास करणे शक्य नाही, त्यामुळे मराठी भाषा संवर्धनात महानुभाव संप्रदायाची भूमिका अतिशय मार्मिक व महत्वाची असल्याचे डॉ राष्ट्रपाल मेश्राम म्हणाले. महानुभाव संप्रदायाने मराठी भाषेत हजारो ग्रंथाची निर्मिती केली, असे विचार प्रा भारतभूषण शास्त्री यांनी अध्यक्षीय भाषण करताना व्यक्त केले.
संस्कृत भाषेतही शेकडो ग्रंथ निर्माण करून मराठी – संस्कृत अनुबंध समृद्ध केला व मराठी भाषेला एक आयाम प्राप्त करून दिला असे ते म्हणाले. दामोदर पंडित – केशोबास आचार्यांना संस्कृत प्रश्न विचारतात तेव्हा “तुमचा अस्मात कस्मात मी नेणगा, मज श्रीचक्रधरे निरुपीली मऱ्हाटी तियाचि पुसा” असा मराठी भाषेविषयी दंडक घालून आचार्य नागदेवांनी मराठी भाषा पुढे संवर्धित केली. त्यामुळे आचार्य नागदेव हे मराठी भाषेतील पहिले भाषा संवर्धक असल्याचे प्रा भारतभूषण शास्त्री म्हणाले.
भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाद्वारे वारसा महानुभाव साहित्याचा या उपक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी महानुभाव साहित्यात अमूल्य योगदान देऊन मराठी भाषा संवर्धनात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या घटकांवर चर्चा केली जाईल, विविध दुर्लक्षित बाबींवर चर्चा करून अभ्यासक व संशोधकांना एक वेगळी उपलब्धी प्राप्त होईल, असे प्रा भारतभूषण शास्त्री म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ गोविंदशास्त्री शिंदे यांनी केले तर आभार डॉ दीपा हटवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तृषाल रामटेके, अभिलाष पंजाबी व राधा कनोजीया यांनी परीश्रम घेतले.