गोंडवाना विद्यापीठात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
महात्मा ज्योतिबा फुले समाज विकासाचे अखंड ऊर्जास्रोत – डॉ हेमराज निखाडे
गडचिरोली : महात्मा जोतिबा फुले आधुनिक महाराष्ट्रातील पहिले युगप्रवर्तक मराठी कवी, नाटककार आणि विचारवंत आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सामाजिक सुधारणांचा प्रेरणास्रोत म्हणून महात्मा फुले ओळखले जातात. या महामानवाच्या कर्तुत्वामुळेच बहुजन समाजात सामाजिक, सांस्कृतिक बदल घडून आले असून महात्मा ज्योतिबा फुले समाज विकासाचे अखंड ऊर्जास्रोत आहे, असे प्रतिपादन डॉ हेमराज निखाडे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ विनायक शिंदे, प्रमुख वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठातील मराठीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ हेमराज निखाडे तसेच सहाय्यक कुलसचिव डॉ संदेश सोनुले, इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रफुल नांदे, गणित विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संदीप कागे, शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ विकास चित्ते, रसायनशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ सुषमा वनकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करतांना जल, जंगल, जमीन, उद्योजकता, आरोग्य, स्वच्छता, पाणी इत्यादी तसेच शिक्षणातील कौशल्य विकास, आधुनिक शेतीचा प्रयोग, शेतकऱ्यांना शेतीचे प्रशिक्षण अशा विविध कार्याचा राष्ट्रनिर्माण करण्यासाठी घेतलेल्या सहभागाचा व त्यांनी राबविलेल्या विविधांगी योजनांचा डाॅ निखाडे यांनी परिचय करून दिला.
अध्यक्षीय भाषण करतांना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ विनायक शिंदे म्हणाले, मानवाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान घेत राहावे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत करावी तरच यशस्वी होता येते. असे मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डाॅ अनिल हिरेखन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ रजनी वाढई यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन इंग्रजी विभागाचे सहायक प्राध्यापक अतुल गावस्कर यांनी तर आभार अर्थशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ महेंद्र वर्धलवार यांनी मानले.