महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि बीव्हीजी इंडिया लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि बीव्हीजी इंडिया लि. या दोन संस्थांमध्ये मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी, उपकुलसचिव डॉ.परमिंदर कौर धिंग्रा, बीव्हीजी इंडिया लि. मानव संसाधन कॉर्पोरेट विभागाचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विभागप्रमुख रवी घाटे व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा एक भाग म्हणून या सामंजस्य कराराकडे पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एमजीएम विद्यापीठ कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील संधीची उपलब्धता होण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार करण्यात येतात. शैक्षणिक विषयांना अनुसरून हा आजचा करार करण्यात आलेला आहे. कौशल्य विकास, प्रकल्पाधारित शिक्षण, संशोधन, नाविन्यता यासाठी या सामंजस्य कराराचा फायदा होणार आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता संशोधन करणे सोयीचे होणार आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असताना विद्यार्थ्यांना स्वत:च्या क्षमतांना आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना न्याय देण्यासाठी वाव मिळणार आहे. विशेषत: येत्या काळामध्ये या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील असे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन, कौशल्य विकास, आंतरवासिता, प्रशिक्षण, संसाधणे, अभ्यासक्रम निर्मिती, प्रशिक्षण पद्धती, नोकरीच्या संधी, औद्योगिक क्षेत्र भेट आदींची संधी उपलब्ध होणार आहे.
बीव्हीजी इंडिया लि. संदर्भात माहिती :
अगदी ८ लोकांच्या सोबतीने भारत विकास ग्रुप म्हणजेच बीव्हीजी संस्थेची हणमंतराव गायकवाड यांनी स्थापना केली. आज बीव्हीजी संस्थेत ७५ हजारांहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. सेवा क्षेत्रात एका मराठमोळ्या माणसाचे नाव आज जगभर केवळ बीव्हीजीने केलेल्या दर्जात्मक कामामुळे घेतले जात आहे. आज बीव्हीजी देशाचे संसद भवन, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, प्रधानमंत्री निवासस्थान अशा कित्येक ठिकाणी हाऊस कीपिंगचे काम करीत आहे. एमजीएम विद्यापीठाचा परिसरही स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यामध्ये बीव्हीजीच्या कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी यांचे पवित्र स्थान असलेल्या पंढरपूर येथील स्वच्छता करण्याचे काम बीव्हीजीच्या माध्यमातून कोणताही मोबदला न घेता केले जाते.