महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे अमरावती विद्यापीठात आयोजन
आव्हान चान्सलर्स ब्रिागेड-2024
महाराष्ट्रातील 23 विद्यापीठांचे 1048 विद्यार्थी सहभागी होणार
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘आव्हान – 2024’ चान्सलर्स ब्रिागेड या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे 7 ते 16 नोव्हेंबर, 2024 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:00 वा होणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, उद्घाटक म्हणून एन डी आर एफ, पुणे येथील संतोष सिंग, प्रमुख अतिथी म्हणून अमरावती शहर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रविंद्र कडू, भैय्यासाहेब मेटकर, डॉ व्ही एच नागरे, डॉ नितीन चांगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
23 विद्यापीठांचे 1048 विद्यार्थी सहभाग घेणार
सदर शिबिरामध्ये महाराष्ट्रातील 23 विद्यापीठांतील 604 मुले व 444 मुली असे एकूण 1048 विद्यार्थी व त्यांच्या सोबत 72 चमू व्यवस्थापक सहभागी होणार आहे.
प्रशिक्षणात मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण एन डी आर एफ, पुणे यांच्या चमूकडून देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना अग्निसुरक्षा, अग्निरोधक, जंगलाची आग, भूकंप, ज्वालामुखी, भुस्खलन, सर्पदंश, ढगफुटी, चक्रीवादळ, जैविक व रासायनिक आपत्ती, आण्विक आपत्ती, पुरग्रस्त व्यवस्थापन, रोप रेस्क्यू, प्रथमोपचार, त्सुनामी अशा विविध आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रशिक्षणातून दिले जाणार आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय समारंभ 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:00 वा होणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ मिलींद बारहाते भूषविणार आहेत. समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ प्रवीण रघुवंशी, डॉ आर डी सिकची, डॉ अविनाश बोर्डे, डॉ विद्या शर्मा उपस्थित राहणार आहेत.
समारंभाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ अविनाश असनारे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या रा से यो कक्षाचे राज्य संपर्क अधिकारी डॉ निलेश पाठक, विद्यापीठाच्या रा से यो चे संचालक डॉ निलेश कडू यांनी केले आहे.