नविन शैक्षणिक धोरण राबविण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य – चंद्रकांतदादा पाटील
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा. राम ताकवले संशोधन केंद्र व शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स (IATE) यांच्या संयुक्त विद्यमाने आय.ए.टी.ई ची ५६ वी तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाचा प्रारंभ दिपप्रज्वलनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कविता साळुंके यांनी केले. प्रा. मोहम्मद मियान, अध्यक्ष, आयएटीई, नवी दिल्ली यांनी शिक्षणाच्या पुनर्रचनेसह शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्रचनेवर आपले विचार मांडले. त्यांनी शैक्षणिक धोरण 2020 चा पाया,शालेयस्तर पूर्वतयारी, मध्मम आणि माध्यामिक टप्पे समजावून सांगितले. सर्व विषयांचा आधार म्हणून प्राचीन भारतीय ज्ञानाचे महत्व देखील त्यांनी सांगितले. आपल्या मुख्य भाषणात प्रा. शशिकला वंजारी, कुलगुरू, एनआयईपीए, नवी दिल्ली यांनी नविन शैक्षणिक धोरण संरचना आणि भारतीय परंपरा यावर आपले विचार व्यक्त केले. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांनी विविधतेतील एकतेचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व सांगितले. संदेशामध्ये जीवन आणि समाजातील भारतीय कौशल्यांच्या भूमिकेचा आणि नवीन आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रांमध्ये सहभागी होण्याचा आणि शिकवण्याच्या प्रक्रियेबद्दल उल्लेख केला आहे. कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी सर्वांना सक्रिय सहभाग घेण्यास प्रवृत्त केले.
संध्याकाळी चंद्रकांतदादा पाटील, मंत्री उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन उपस्थित राहून सर्वाना मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांच्या हस्ते विविध शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आपले विचार व्यक्त करतांना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, नविन शैक्षणिक धोरण राबविण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. नविन शैक्षणिक धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाला जे जे काही करणे शक्य होईल त्यासाठी शासन सतत प्रयत्नशील राहिल. स्कूल कनेक्ट अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी नक्कीच मदत होईल, यासाठी सर्व महाविद्यालये, विद्यापीठामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले. जगात ज्या ज्या विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अथवा मागणी असणार आहे, त्यानुसार नविन शैक्षणिक धोरणामध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यापीठामार्फत सुरू होणाऱ्या ड्रोन अभ्यासक्रमाचे उद्घाटन चंद्रकातदादा पाटील, मंत्री उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या मैदानावर ड्रोन उडवून त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याप्रसंगी मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्रा. बी. आर. कुक्रेती, सरचिटणीस, आयएटीई, कुलसचिव दिलीप भरड, डॉ. संजीवनी महाले, संचालक, शिक्षणशास्त्र विद्याशाखा हे देखील मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी पाटील आणि रेणुका चव्हाण यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. आशा ठोके यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अनिल कुलकर्णी, डॉ. जयदिप निकम, विविध विद्याशाखेचे संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, तसेच देशभरातून आलेले विविध मान्यवर उपस्थित होते.