राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महंत नागराज बाबा महानुभाव (दिगंबर कपाटे) स्मृती व्याख्यानमाला संपन्न

महानुभाव साहित्य मराठी भाषेचे वैभव – मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अविनाश आवलगावकर यांचे प्रतिपादन

नागपूर : महानुभाव साहित्य मराठी भाषेचे वैभव असल्याचे प्रतिपादन अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अविनाश आवलगावकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधरस्वामी अध्यासन केंद्राच्या वतीने महंत नागराज बाबा महानुभाव (दिगंबर कपाटे) स्मृती व्याख्यानमाला शुक्रवार, दि. ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पार पडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसरातील एलईडी चौक गांधी भवन येथे आयोजित व्याख्यानमालेत कुलगुरू डॉ. आवलगावकर मार्गदर्शन करीत होते.

व्याख्यानमालेला प्रमुख वक्ता म्हणून अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अविनाश आवलगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु डॉ सुभाष कोंडावार, प्रमुख अतिथी म्हणून मानव विज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, अध्यासन प्रमुख प्रा. भारत मिसाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तत्कालीन महानुभवेतर साहित्यात काव्य तर महानुभाव साहित्यात गद्य-पद्य आदी दोन्ही प्रकार दिसून येते.

गद्य सरळ सोपे असून काव्य भाषा अवघड असते. गद्यामध्ये आकर्षणाची ताकद असून गद्य ही ज्ञानभाषा होऊ शकते. गद्य आणि पद्य असे दोन्ही प्रकार महानुभाव साहित्यात असल्याने मराठी भाषेविषयी उच्चतम श्रेष्ठता महानुभाव साहित्यात पाहायला मिळते, असे कुलगुरू डॉ. आवलगावकर पुढे बोलताना म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि मराठी भाषा विद्यापीठ निर्माण झाले. अभिजात भाषेच दर्जा मिळणे आणि मराठी भाषा विद्यापीठ होणे हे मराठी भाषिकांसाठी आनंदाची, समृद्धीची बाब असली तरी अभिजात भाषा म्हणजे काय?, अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे नेमके काय? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये निर्माण झाले आहे.

अभिजात म्हणजे क्लासिकल, परंपरा, समृद्ध परंपरेचा वारसा असलेल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. अभिजात भाषेचा दर्जा दिला जात असताना तीन-चार निकष काटेकोरपणे तपासले जाते. यामध्ये प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभू, सलगता आदी निकष महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. आवलगावकर यांनी सांगितले. प्राचीनता अर्थात मराठी भाषेला प्रदीर्घ परंपरा आहे. किमान भाषा अडीच हजार वर्षे जुनी असावी, असा निकष आहे. इ.स. ५०० मधील ”महावंश’ या बौद्धग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख करण्यात आला आहे. यासह अनेक ग्रंथात मराठीचा उल्लेख करण्यात आल्याचा संदर्भ असल्याने मराठी भाषा आपोआप प्राचीन भाषा असल्याचे सिद्ध होते.

लोकसाहित्य, आदिम साहित्यातून भाषा निर्माण झाली असली तरी त्याचे मूळ शोधणे अवघड असते. मराठी भाषेचे अस्तित्व अनेक शतकांपूर्वींचे असून इ.स. पूर्वी २६० अर्थात तिसऱ्या शतकात ब्राह्मी लिपीत मराठीचा उल्लेख आला आहे. यावरून मराठीची प्राचीनता लक्षात येते. मराठी भाषेचा साहित्य निर्मितीत अधिकाधिक वापर झाला असून मराठी भाषा कोठेही कमी पडली नाही, यातून श्रेष्ठता निर्माण होते. स्वतःचे अस्तित्व असल्याने मराठी भाषा ही स्वयंभू आहे. भाषेच्या उगमापासून ते आजपर्यंत आढळून आलेल्या साहित्यात मराठी भाषा स्वतंत्रपणे सलगपणे वावरते आहे. प्राचीन काळाचा इतिहास बघता लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, संत साहित्य ते आधुनिक साहित्यात सातत्याने मराठी भाषेचा वापर होत आला आहे.

सलगपणे साहित्य निर्मिती करणारी, प्रचंड ग्रंथ निर्मिती करणारी मराठी भाषा यामुळे अभिजात झाल्याचे डॉ. आवलगावकर यांनी सांगितले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने कोणाला फरक पडला नसेल, मात्र जनसामान्यांना याचा फरक पडला. सर्वसामान्यांना माहिती नसेल आपली भाषा किती श्रीमंत आहे. यावर शिक्कामोर्तब होते तेव्हा त्याचे मूल्य अनेक पटीने वाढत असते. त्यामुळे मराठी भाषेचे मूल्य विकसित करीत श्रेष्ठत्व टिकविणे आपल्या हातात आहे, असे आवलगावकर म्हणाले. मातृभाषेतून ज्ञान प्राप्त करणे अधिक सोपे असते,. अन्य भाषा शिकण्यास विरोध नाही. मात्र, मातृभाषेविषयी भावना जागी ठेवली पाहिजे. समाजाला भाषा भान येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या सोबतच त्यांनी महानुभाव साहित्यातील विविध उदाहरणे देत म्हाईभंट, महंदबा यांच्या साहित्यातील उदाहरण देत मराठी भाषेची महती पटवून दिली.

अध्यक्षीय भाषण करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करताना मातृभाषेतून शिक्षण दिल्यास अधिक समजत असल्याचे सांगितले. महानुभाव साहित्यातील मराठी भाषेचे महत्व याबाबत त्यांनी माहिती दिली. विज्ञान कशाप्रकारे मातृभाषेतून शिकल्यास त्यातील संशोधन समजून घेण्यास मदत मिळेल असे देखील त्यांनी सांगितले. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करताना अध्यासन प्रमुख प्रा. भारत मिसाळ यांनी व्याख्यानमाला आयोजित करण्याबाबत माहिती दिली. महानुभाव पण त्यातील महंत नागराज बाबा महानुभाव यांच्या विषयी त्यांनी माहिती दिली. सुश्री केशरताई मेश्राम यांच्या दाननिधीतून या वाख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी अध्यासनाद्वारे घेण्यात आलेल्या महानुभाव संप्रदायातील विविध साहित्यकृतींवर आधारीत ग्रंथ परिक्षण स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयीन गटातून प्रथम क्रमांक त. नम्रता राहेरकर, द्वितीय क्रमांक अनुज मंचावार, तृतीय क्रमांक रुपाली सोनुने, उत्तेजनार्थ विशाखा डहाट, खुल्या गट्यातून प्रथम क्रमांक मुकुंद बाविस्कर नाशिक, द्वितीय क्रमांक अमोल निंबाळकर वरोरा, तृतीय क्रमांक वासुदेव चव्हाण, उत्तेजनार्थ विशाल हिवरखेडकर यांची निवड करण्यात आली अशी माहिती कार्यक्रम समन्वयक तृषाल रामटेके यांनी दिली. उपस्थितांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ .राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार प्रा. भारत मिसाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com