देवगिरी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मिलिंद नगर येथे महास्वच्छता अभियान
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांनी दि ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महास्वच्छता अभियानास सुरुवात केली आहे. दि ०५/ ०८/२०२४ रोजी येथील देवगिरी महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महास्वच्छता अभियान या उपक्रमांतर्गत मिलिंद नगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर, महानगरपालिका उपायुक्त रवींद्र जोगदंड, डॉ दिवाकर कुलकर्णी (अध्यक्ष, सावित्रीईबाई फुले महिला एकात्मता समाज, तथा वैद्यकीय अधिकारी गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र ), राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संचालिका डॉ सोनाली क्षीरसागर, सविता दिवाकर कुलकर्णी, महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख यांची प्रमुख उपस्थित होती. या महास्वच्छता अभियानाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगदंड म्हणाले की स्वच्छता हि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास देश स्वच्छ व सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना हे आमच्या महास्वच्छता अभियानाचा कणा आहे. देवगिरी महाविद्यालय हे एक नामांकित महाविद्यालय असून त्यांनी नेहमीच अशा उपक्रमामध्ये महानगरपालिकेला सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांसाठी हि देश सेवा करण्याची चांगली संधी आहे, या संधीचा आपण उपयोग करावा आपल्याला हवे असलेले सर्वतोपरी सहकार्य आमच्या वतीने केले जाईल.
या कार्यक्रमात बोलतांना देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर असे म्हणाले की सद्यकालीन परिस्थितीमध्ये स्वच्छ भारत सुंदर भारत आपणास बनवायचा असेल तर युवकांची भूमिका हि महत्त्वाची असणार आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांनी माझा कचरा हि माझी जबाबदारी ह्या भूमिकेतून कचरा नियोजन केल्यास स्वछ शहर होण्यास वेळ लागणार नाही. देवगिरी महाविद्यालय नेहमीच अशा सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रस्थानी असते. देवगिरी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या मदतीने या वर्षी जवळपास १५००० वृक्षांची लागवड करणार आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाने यापूर्वी या अभियानांतर्गत देवगिरी महाविद्यालय परिसरात स्वच्छता करून या अभियानाची सुरवात केली, तसेच ज्या भागामध्ये खरंच स्वच्छतेची गरज आहे अशा भागात या ठिकाणीं स्वच्छतेचे कार्य करण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील तरुण सज्य आहेत.
या उपक्रमामध्ये आपल्या परिसरातील नागरिक व विशेषतः तरुणांनी ही सक्रियपणे सहभागी होऊन आमच्या महाविद्यालयातील स्वयंसेवकांना सहकार्य करावे. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक व कार्यक्रमाधिकारी डॉ अनंत कनगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात देवगिरी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा महानगरपालिका व मिलिंद नगर मधील नागरिक यांच्यामधील एक अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून काम करेल व या भागाची फक्त स्वच्छताच न करता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे कामही करेल असे आव्हान केले.
कार्यक्रमाधिकारी डॉ भाऊसाहेब शिंदे, कार्यक्रमाधिकारी सुवर्णा पाटील, रासेयोच्या सल्लागार समिती सदस्य डॉ रंजना चावडा, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरचे अधिकारी व कर्मचारी, देवगिरी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि अँड मॅनॅजमेन्ट स्टेडिसचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ शेखर कोठुळे, प्रतीक जैस्वाल, सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र येथील डॉ पिराजी कमले व स्वयंसेवक भगिनी, मिलिंद नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक तसेच रासेयोचे स्वयंसेवक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.