यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील ‘अनुवाद कार्यशाळेत’ साहित्य मंथन

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या भाषा अनुवाद केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष अनुवाद कार्यशाळेचा दुसरा दिवस व्याख्यान, चर्चासत्र आणि कृतीसत्रांनी उत्साहात संपन्न झाला. ही कार्यशाळा भाषा अनुवाद केंद्र आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास (नॅशनल बुक ट्रस्ट – भारत सरकार, नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मुख्यालयात दि. २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

शनिवारी झालेल्या सत्रात प्रसिद्ध भाषा अभ्यासक व समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांनी ‘समाजभाषा आणि अनुवाद’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. दोन संस्कृतींमधील सामाजिक संवाद साधण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून अनुवादाकडे पाहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. परंपरा, म्हणी-वाक्प्रचार आणि सामाजिक संदर्भांनुसार शब्दांचे अर्थ बदलत असल्याने शब्दशः भाषांतर अयोग्य ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास आवश्यक असून सामाजिक अभ्यासक उत्तम अनुवादक ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Literary brainstorming at the 'Translation Workshop' of Yashwantrao Chavan Maharashtra Open University.
Literary brainstorming at the ‘Translation Workshop’ of Yashwantrao Chavan Maharashtra Open University.

मंगळसूत्र, पदर, पुरणपोळी, ई-मेल, क्रिप्टो करन्सी, बिटकॉईन यांसारख्या अनेक शब्दांना थेट पर्यायी शब्द उपलब्ध नसतात. अशा वेळी मूळ शब्द कायम ठेवून संदर्भ किंवा तळटीप देणे अधिक योग्य ठरते, असेही त्यांनी अधोरेखित केले.

यानंतर ‘अनुवादकाचे अनुभव व समस्या’ या विषयावर सुप्रसिद्ध अनुवादक व पत्रकार श्रीमती अपर्णा वेलणकर, ॲड. अभय सदावर्ते आणि श्री. प्रफुल्ल शिलेदार यांनी आपले अनुभव मांडले.

श्रीमती अपर्णा वेलणकर यांनी ‘सिलेक्टेड मेमरी’, ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ आणि ‘शांताराम’ या अनुवादित पुस्तकांतील अनुभव सांगताना अनुवाद ही अनुभवसमृद्ध करणारी प्रक्रिया असल्याचे नमूद केले. अनुवाद म्हणजे मूळ लेखकासोबत चालत नवे लेखनमार्ग शोधणे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ॲड. अभय सदावर्ते यांनी अनुवाद हे शास्त्र आणि कला दोन्ही असून भाषेचा प्रवाह टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
तर श्री. प्रफुल्ल शिलेदार यांनी काव्य अनुवादावर मार्गदर्शन करताना कवितेचा अनुवाद म्हणजे हृदयस्पर्शी स्थानांतर असून त्यात आशय व सौंदर्य जपणे अत्यंत जिकीरीचे असल्याचे स्पष्ट केले.

कार्यशाळेतील वक्त्यांचा परिचय डॉ. मंगला वरखेडे, रुपाली गायकवाड आणि डॉ. उत्तम करमाळकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाषा अनुवाद केंद्र व ज्ञान स्रोत केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश बर्वे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com