कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. विलास सपकाळ यांना प्रदान
छत्रपती संभाजीनगर, दि. १८ : गेल्या चार दशकापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अमलबजावणीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संस्थेच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा अभियंता भवन, अमरावती येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, खासदार डॉ.अनिल बोंडे, वैज्ञानिक डॉ. माधवी ठाकरे, मनपा आयुक्त देविदास पवार, संस्थेचे अध्यक्ष गणेश बारब्दे, सचिव हरिश मोहोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य अभियंता श्री. गजबिये, एडब्लूडब्लूएचे सचिव आनंदराव जवंजाळ, प्रा. मुकादम व सर्व संबंधित उपस्थित होते.दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) अमरावती शाखेच्या वतीने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंती निमित्त आयोजित ५६ व्या अभियंता दिनानिमित्त अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सन १९९८ पासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. या वर्षीच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थी हिताला प्राधान्य देत गेली चार दशके झाली मी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. आज इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संस्थेच्यावतीने मला हा जो जीवनगौरव पुरस्कार दिला गेला, त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कार्य करीत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल या पद्धतीचे हे धोरण बनविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये निर्माण करण्यासाठी आम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहोत. हा पुरस्कार मिळाला याचा मनस्वी आनंद असून अधिक काम करण्यास यामुळे ऊर्जा मिळेल, असा विश्वास यानिमित्त व्यक्त करतो. – डॉ. विलास सपकाळ ( कुलगुरू, महात्मा गांधी मिशन विद्यापीठ)
प्रा. डॉ. विलास सपकाळ यांच्याविषयी माहिती :
कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी आयआयटी पवई येथून आपले अभियांत्रिकीचे ( एम.टेक – रासायनिक अभियांत्रिकी ) शिक्षण पूर्ण केले आहे. ते सध्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. या अगोदर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित राज्य सरकारच्या सुकाणू समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएम विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वीपणे अमलबजावणी केलेली आहे.