“समाजासाठी प्रेरक ठरणारे आजीवन अध्ययनाचे अभ्यासक्रम” – राज्य माहिती आयुक्त रविंद्र ठाकरे यांचे प्रतिपादन
अमरावती : विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे अभ्यासक्रम हे समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आधारित असून, विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यात अत्यंत उपयुक्त ठरत आहेत, असे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त मा. श्री. रविंद्र ठाकरे यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे आयुक्त श्री. ठाकरे यांच्या स्वागतपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. महेंद्र मेटे, डॉ. भगवान फाडके आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, “विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत चालवले जाणारे पदव्युत्तर अभ्यासक्रम हे शिक्षणाची तहान भागविणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. समाजात माहिती अधिकाराची जाणीव वाढविण्यासाठी विद्यापीठ व राज्य माहिती आयोग एकत्रितपणे प्रभावी भूमिका बजावू शकतात.”

श्री. ठाकरे यांची नुकतीच राज्य माहिती आयुक्त म्हणून अमरावती कार्यालयात नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अतिरिक्त विभागीय आयुक्त अशा अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर प्रभावीपणे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यनिष्ठेची आणि पारदर्शक कारभाराची प्रशंसा करत डॉ. श्रीकांत पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
डॉ. पाटील म्हणाले, “विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील अभ्यासक्रम हे समाजासाठी दिशा दर्शवणारे असून, नागरिकांमध्ये हक्क व अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. राज्य माहिती आयोग यामध्ये प्रभावी भागीदार ठरू शकतो.”
या प्रसंगी राज्य व समाजहिताच्या दृष्टीने आयुक्त श्री. रविंद्र ठाकरे यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ विद्यापीठाला निश्चितच मिळेल, अशी भावना विद्यापीठ प्रशासनात व्यक्त होत आहे.