ग्रंथालये हे माझ्यासाठी मंदिरासमान – डॉ. शरद बाविस्कर

एमजीएममध्ये माझे लेखन माझी भूमिका‘ विषयावर डॉ. शरद बाविस्कर यांचे व्याख्यान यशस्वीपणे संपन्न

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : संघर्ष हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो आणि माझ्या वाट्याला देखील संघर्ष आला आहे. इथपर्यंत शैक्षणिक प्रवास करत असताना माझ्या क्षमतेनुसार आणि आकलनानुसार मी कायम भूमिका घेत आलो आहे. एकंदरीतच माझी परिस्थिती पाहता उपयुक्ततावादी दृष्टीकोनापलीकडे जाऊन शिक्षण घेणे माझ्यासाठी भूमिका घेण्यासारखं असून ग्रंथालयांनी माझ्यासाठी मंदिरासमान काम केले असल्याचे प्रतिपादन लेखक प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी यावेळी केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या मराठी भाषा विभाग आणि प्रगतिशील लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज एमजीएम विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात ‘भुरा’ आत्मकथनाचे लेखक तथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘माझे लेखन माझी भूमिका’ या विषयावर व्याख्यान यशस्वीपणे संपन्न झाले.  यावेळी, प्रा. डॉ. बाविस्कर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी विचारवंत डॉ.उमेश बगाडे, प्रगतिशील लेखक संघाचे कार्याध्यक्ष डॉ.सुधाकर शेंडगे, लेखक प्रल्हाद लुलेकर, लेखक वासुदेव मुलाटे, अधिष्ठाता डॉ.रेखा शेळके व लेखक डॉ.मनोहर शिरसाट उपस्थित होते.

'भुरा' आत्मकथनाचे लेखक तथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर

यावेळी बोलताना प्रा. डॉ. बाविस्कर म्हणाले, ‘भुरा’ हे माझे आत्मकथन नसून स्व:कथन आहे. हे ठरवून लिहिलेले पुस्तक नसून स्वत: शी बोलत गेलो आणि यातून भुरा’चा जन्म झाला. सन १९९५-९६ साली इंग्रजी विषयासह दहावीमध्ये नापास होणारा विद्यार्थी ते आज ८ भाषा शिकून ५ विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दोन दशकं अदृश्य राहून अभ्यास करणं मला गरजेचं वाटलं. तीन चार वर्षांपूर्वी जेएनयू एक्सीक्युटीव्ह कॉन्सिल’चा सदस्य असल्याने नैसर्गिकरित्या प्रकाश झोतात आलो आणि ह्या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात परत प्रवेश केला.लेखकाबद्दल कायम बरेच बोलले जाते असते. लेखक म्हणजे समाजाला आवडणारे लिहिणारा असे चित्र रंगवले जात असले तरी त्यात काही सत्य नसते. ज्याला आपण लेखक म्हणतो तो एखादी कथा, कादंबरी लिहीत असताना सत्य मांडतो. लेखक हा कायम वास्तव आणि सत्य मांडणारा असतो, असे प्रा. डॉ. बाविस्कर यांनी यावेळी सांगितले. प्रा. डॉ. बाविस्कर म्हणाले, विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणात घडण्यासाठी पोषक असणारे वातावरण देणाऱ्या शिक्षणाची आज आपल्याला गरज आहे. विद्यार्थी आज खूप गोंधळलेला असून त्याची एकाग्र राहण्याची क्षमता ४ सेकंदापेक्षा अधिक राहिलेली नाही. किती रिल्स पाहणार? या रिल्स पाहता – पाहता तरुणाईचा कधी त्यात एक तास निघून जातो हेही कळत नाही आणि विशेषत: त्यातून समाधानही नाही. स्वतःशी प्रामाणिक राहत काहीतरी करण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे. सर्व प्रसिद्धीपासून दूर राहत काही काळ अदृश्यपणे स्वत:वर काम करणे आवश्यक आहे. ज्ञान प्रक्रिया केवळ साधन असते तेंव्हा ती रटाळ होते. समकालीन काळामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. मेंदूचे रंजन करणे ही शिक्षकांची जबाबदारी असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अभ्यासपूर्ण व्यक्त झाले पाहिजे.

Advertisement
एमजीएममध्ये 'माझे लेखन माझी भूमिका' विषयावर डॉ. शरद बाविस्कर यांचे व्याख्यान

यावेळी या आत्मकथनावर भाष्य करताना प्रा.डॉ.मनोहर शिरसाट म्हणाले, ‘भुरा’ आत्मकथनाचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांच्या जीवनाचा संघर्ष १६ व्या वर्षांपासून सुरू होतो. बहुजन समाजातील युवकांसाठी ही संघर्ष गाथा प्रेरक अशी आहे. आजपर्यंत या आत्मकथनाच्या १३ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून जीवनातील तात्विक भाष्य यात केलेले आहे. प्रत्येक वाचकाला ही कादंबरी वाचत असताना आपण स्वतः नायक असल्यासारखे वाटते. नव्या पिढीसाठी हे प्रेरक असे आत्मकथन आहे. तरुणांमध्ये स्वप्न पेरण्याचे काम ‘भुरा’ या आत्मकथनाने केले आहे. आशावाद, आत्मसन्मान, स्वाभिमानी बाणा, मानवतावाद हे मूल्य यातून व्यक्त केलेले आपणास पाहायला मिळते.

‘भुरा’ आत्मकथन सर्वांसाठी प्रेरक असून लेखक प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी स्व:विषयी चिकित्सक असणे गरजेचे असल्याचे यामध्ये मांडले आहे. शिक्षण हे माणसाला बदलते हे आपल्याला लेखकाच्या आयुष्याकडे पाहून समजते असे कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना विचारवंत डॉ.उमेश बगाडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे यांनी तर आभार प्रा. डॉ. मारोती गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page