गोंडवाना विद्यापीठात कायदेविषयक शिक्षण शिबीर संपन्न
रॅगिंग प्रतिबंधक कायदा,मादक पदार्थांचे सेवन आणि अंमली पदार्थांचे व्यसन या विषयावर मार्गदर्शन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात रॅगिंग प्रतिबंधक कायदे, मादक पदार्थांचे सेवन आणि अंमली पदार्थांचे व्यसन (Anti Ragging Laws & Drug Abuse and Drug Addiction) या विषयावर कायदेविषयक शिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे, मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर आर पाटील, गडचिरोली, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ नियत्रंण समितीचे प्रमुख राहुल आव्हाड आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषण करतांना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे म्हणाले, रॅगिंग हे अक्षम्य कृत्य आणि गुन्हा म्हणून गणले जाते. रॅगींगकरीता शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. रॅगींगला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागृत राहणे आवश्यक आहे. रॅगींग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत माहिती सबंधिताना द्यावी. शिबीराच्या माध्यमातून मार्गदर्शकांनी केलेल्या सुचनांचे पालन केल्यास विद्यार्थी अंमली पदार्थ तसेच रॅगींगपासून दुर राहू शकतो असे कुलगुरु डॉ बोकारे म्हणाले.
सदर कायदेविषयक शिबीरात गडचिरोली, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ नियत्रंण समितीचे प्रमुख राहुल आव्हाड यांनी अंमली पदार्थाचे सेवन व त्याचे होणारे दुष्परीणाम या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यासोबतच, अंमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर होणारी कार्यवाही तसेच घडणाऱ्या गुन्ह्याबाबत माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर आर पाटील यांनी रॅगींगचे प्रकार, त्यापासून होणारे परीणाम तसेच त्याकरीता असलेली शिक्षेची तरतुदीबाबत माहिती दिली. शिबीराला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक वृंद, पालक, अँटी रॅगिंग समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार मराठी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ निळकंठ नरवाडे यांनी मानले.