नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागात व्याख्यान संपन्न
स्वातंत्र्याने मिळाला न्याय, समता, बंधुत्वाचा अधिकार – स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे यांचे प्रतिपादन
नागपूर : स्वातंत्र्याने न्याय, समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्याचा अधिकार दिला असल्याचे प्रतिपादन स्वातंत्र्य संग्राम सेनानी लीलाताई चितळे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागात शनिवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी “गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमाची प्रासंगिकता” या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विकास जांभुळकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वातंत्र्य संग्राम सेनानी लीलाताई चितळे, सर्वोदय आश्रमाचे सचिव रविभाऊ गुळदे उपस्थित होते. लीलाताई चितळे यांनी आपल्या संवादाची सुरुवात “बाबा-बापू अमर रहे” हा नारा देऊन केला. संवाद साधताना लीलाताईनी अस्वस्थ आणि आशावादी म्हणून स्वतःला संबोधित केले. आजची राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे मी अस्वस्थ आहे आणि तुमच्या सारख्या युवकामुळे याच परिस्थितीवर मात करून बदल घडवून आणण्याचा आशावाद बाळगत असल्याचे त्या म्हणाल्या. ९५ वर्षांच्या लीलाताई चितळे यांनी न्याय, समता, बंधुत्व व स्वातंत्र्य हे चार अंगवस्त्र देशाने दिलेले असून यांचे ज्ञान असू द्या, असे विद्यार्थ्यांना पटवून दिले. या देशातील शक्ती ही संसदेत नसून नागरिकांच्या हातात आहे, असेही त्या म्हणाल्या.
या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांच्या पूर्वजांनी लढा देऊन या आंदोलनात सहभाग नोंदविला. त्यामुळे या देशातील कणांकणावर सर्व जाती – धर्म – पंथांच्या लोकांचा समान अधिकार आहे. त्याचे प्रतिक म्हणजे तिरंगा होय. तिरंगा हा गुलामगिरीतून मुक्त होण्याचे प्रतिक आहे. या प्रतिकामध्ये सर्वांचा समावेश दिसून येतो. माणसांच्या विचारात फरक आहे, रक्तात नाही. जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी शरीरश्रम आणि आंतरजातीय विवाह महत्त्वाचे साधन आहे. या देशाचा धर्मग्रंथ हा संविधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत माणसाच्या हृदयातील राम प्रत्यक्ष दर्शन देणार नाही. त्यासाठी बाबा आणि बापू एकत्र पाहणे आवश्यक आहे, असे मत लीलाताईंनी आपल्या संवादातून व्यक्त केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी रविभाऊ गुळदे यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र, समता, न्याय सोबतच बंधुता सर्वात महत्त्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन केले. महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित गीते प्रस्तुत केली. विभाग विभाग प्रमुख डॉ विकास जांभुळकर यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण अखेरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचविणे म्हणजेच अहिंसा प्रस्थापित करणारी यंत्रणा राबविणे होय, असे सांगितले. जोपर्यंत सत्तेचे विकेंद्रीकरण होत नाही, तो पर्यंत लोकशाही मूल्य प्रस्थापित होऊ शकत नाही असे त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अंजली खडाटे हीने केले तर आभार प्रा किशोर नैताम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इशिका पिंपळकर, पंकज सोमकुवार आणि विभागातील सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.