यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा’ निमित्त व्याख्यानमाला
भारतीय मूल्यांसोबतच वैश्विक मूल्यांचे भान येणे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट – कुलगुरु प्रा. सोनवणे
नाशिक : ज्ञानप्रवाह निर्माण करणे, तो सर्व घटकांपर्यंत पोहोचणे आणि भारतीय मूल्यांसोबतच वैश्विक मूल्यांचे भान येणे ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची महत्वाची उद्दिष्ट्ये आहेत. या तत्वांच्या माध्यमातून या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध घटकांच्या सहभागातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा’ निमित्त आयोजित व्याख्यानमाले प्रसंगी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उच्च शिक्षणासाठी अंमलबजावणी’ या विषयावर ते बोलत होते. विकसित भारताच्या गरजा पूर्ण करताना सजग नागरिक घडविण्याचा उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून साधला जातो आहे.
ज्ञानसमाज निर्माण – करण्यासाठी हे धोरण महत्त्वाची – भूमिका बजावेल. शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील अन्य घटकांनी धोरण व्यवस्थित समजून घ्यावे आणि विद्यार्थी व पालकांनाही व्यवस्थित समजावून सांगावे, तरच धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होईल, असेही प्रा. सोनवणे म्हणाले. एखाद्या देशाच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय शिक्षण पद्धतीत शाळा ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. विद्यार्थी गुरुकुलात जाऊन जीवनमूल्ये शिकायचे. परंतु, कालांतराने इंग्रजांनी त्यांना हवे असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षण पद्धतीत बदल घडविला. एकविसाव्या शतकात जागतिक स्तरावर आपले अस्तित्व अधोरेखीत करताना भारतीय मूल्यांबरोबर वैश्विक मूल्ये रुजविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. जयदीप निकम यांनी प्रास्ताविक केले. तसेच, आगामी आठवडाभर होणाऱ्या व्याख्यानांची व उपक्रमांची माहिती दिली. यावेळी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे संचालक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सुजाता मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
व्याख्याने ऑनलाईन उपलब्ध
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत २५ जुलैपासून व्याख्यानमाला सुरु आहे. दिनांक २७ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता सूकाणू समितीचे सदस्य महेश दाबक यांचे ‘उद्योगक्षेत्रातील इन्टर्नशीप व अप्रेन्टीशीपच्या संधी’ याविषयावर व्याख्यान होणार आहे. ही सर्व व्याख्याने यु ट्युबवर ऑनलाईन पाहता येणार असून विद्यापीठाच्या ycmou.ac.in या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर त्यासाठीची लिंक उपलब्ध केली जाणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक यासह सर्वांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.