यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा’ निमित्त व्याख्यानमाला
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेला अनन्यसाधारण महत्व – डॉ. पेन्ना
नाशिक : ज्ञान, प्रज्ञा व सत्य हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे तीन आधारस्तंभ आहेत. ज्ञानाचा स्त्रोत असलेले वेद हे जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत. त्यामुळे ज्ञानजिज्ञासा ही आपल्या भारतीय मातीतच होती, असा निष्कर्ष निघतो. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेला किंबहुना भारतीय ज्ञानप्रणालीला अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन कवीकुलगुरू कालिदास संस्कृतविद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा’ निमित्त आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ या विषयावर ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी डॉ. पेन्ना यांचे स्वागत केले. तसेच प्रास्ताविक करताना भारतीय ज्ञान परंपरेतील विविध विषयांचा आढावा घेत या परंपरेचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील महत्व विशद केले. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम, कुलसचिव भटूप्रसाद पाटील, डॉ. संजीवनी महाले, रश्मी रानडे उपस्थित होते. आपल्या ऑनलाईन व्याख्यानात प्राचीन ज्ञानपरंपरेतील वेदकालीन विविध ग्रंथांमधील काही दाखले देत डॉ. पेन्ना यांनी भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेत विज्ञान, गणित, ललित कला, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कृषिविज्ञान, स्थापत्यकला, पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, विमानशास्त्र यासारख्या अनेक महत्वाच्या विषयांचे आपल्या विविध प्राचीन ग्रंथांमध्ये अतीशय अभ्यासू पद्धतीने विवेचन केलेले आढळते, असे सांगितले. बाराव्या शतकापर्यंत भारत हा विज्ञान आणि विविध शास्त्रात विश्वात सर्वोच्च स्थानी होता, असा एकुण विविध ग्रंथांच्या अभ्यासावरून ठाम निष्कर्ष काढता येतो, असे सांगून ते म्हणाले की नालंदा, विक्रमाशिला, ओदांतपुरी यासारखी प्राचीन विद्यापीठे बाराव्या शतकात उद्ध्वस्त केली गेली आणि त्यानंतर भारतीय ज्ञानपरंपरेला ओहोटी लागली. अविक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती ही कौटील्यांची विद्येचा, ज्ञानाचा सिद्धांत स्पष्ट करणारी चतुःसूत्री होती. त्यामुळे मुळातच प्राचीन आणि समकालिन ज्ञानाचे संशोधन, अध्ययन, अध्यापन, प्रकाशन आणि जतन करणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्वाचा भागच आहे, असेही डॉ पेन्ना म्हणाले.