कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने महात्मा फुले यांच्या १३४ व्या स्मृती दिनानिमित्त विचारधारा प्रशाळेच्या सभागृहात अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे यांच्या विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी डॉ. अनिल डोंगरे यांनी चेतना या विषयावरील व्याख्यान दिले. डॉ. डोंगरे यांनी बुद्ध धम्मातील त्रिपिटकांचा सार सांगून मनाचे, चेतनेचे भाव विस्तृत केले. यात दुःखाचे कारण हे मृत्यू असल्याचे त्रिपिटकानुसार नमूद केले. त्याप्रमाणे दुःख उत्पन्न होण्याच्या बारा प्रकारच्या भावनांचे विस्तृतपणे विमोचन केले. याचसोबत विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म.सू. पगारे यांनी पटाचार्य भिक्खूनि यांची कथा सांगत बुद्धांच्या चेतनेचे महत्व विशद केले. सोबतच अष्टशीलाच्या पालनाने चित्ताची एकाग्रता साधता येते. चित्त एकाग्रता साधल्याने मानवाचा प्रज्ञेकडे प्रवास चालू होतो असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. पवित्रा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संशोधक विद्यार्थी महेश सूर्यवंशी यांनी केले.