यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रा राम ताकवले स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान संपन्न

दिवंगत प्रा राम ताकवले मुक्त शिक्षणातील आशिया खंडातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ – प्रा संतोष पांडा

नाशिक : दिवंगत प्रा राम ताकवले हे मुक्त शिक्षण प्रणालीतील केवळ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नव्हे तर दूरदृष्टी असणारे आशिया खंडातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ होते. त्यांनी सर्वांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पायाभरणीतून उपलब्ध करून दिले. त्यामुळेच कॉमनवेल्थ ऑफ लर्निगचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोनवेळा प्राप्त करणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे देशातील एकमेव मुक्त विद्यापीठ आहे असे गौरवोद्गार नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नो) येथील दूरस्थ शिक्षण कर्मचारी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (स्ट्राईड – STRIDE – Staff Training and Research Institute of Distance Education) चे माजी संचालक प्रा संतोष पांडा यांनी येथे काढले.

मंगळवार दिनांक १३ मे २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू दिवंगत प्रा राम ताकवले यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठाच्या प्रा राम ताकवले संशोधन व विकसन केंद्रामार्फत आयोजित व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात आयोजित या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे होते. कुलसचिव दिलीप भरड, प्रा राम ताकवले संशोधन व विकसन केंद्राच्या संचालिका इमिरेटस प्रा कविता साळुंके, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ मधुकर शेवाळे, निरंतर शिक्षण विद्याशाखा संचालक डॉ जयदीप निकम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

यावेळी आपल्या व्याख्यानात बोलतांना पुढे डॉ पांडा म्हणाले की तीन विद्यापिठांचे कुलगुरूपद भूषवणारे प्रा राम ताकवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नो) येथे मिळाली. ते शिक्षणाच्या बाबतीत नेहमी काळाच्या पुढे असायचे. तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती व संभाव्य बदलाची अचूक समज त्यांना होती. नवनवीन संकल्पनांचे ते नेहमी स्वागत करायचे. मुक्त शिक्षणाच्या त्यांच्या या मॉडेलवर हॉंगकॉंग येथे देखील एक मुक्त विद्यापीठ यशस्वीपणे सुरु झाले.

आता नाशिक येथे मुक्त विद्यापीठात त्यांच्या नावाने संशोधन व विकसन केंद्र कार्यरत होणे ही स्वागतार्ह गोष्ट असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. यावेळी डॉ पांडा यांनी आपल्या व्याख्यानात या अनुषंगाने शिक्षणातील बदलते प्रवाह, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारतीय ज्ञान प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षक प्रशिक्षण यातील संभाव्य बदल आदी मुद्द्यांना देखील अधोरेखित केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनावणे यांनी मुक्त विद्यापीठ आजदेखील दिवंगत प्रा राम ताकवले यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार मार्गक्रमण करत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा राम ताकवले संशोधन व विकसन केंद्राच्या संचालिका इमिरेटस प्रा कविता साळुंके यांनी केले. प्रमुख अतिथी यांचा परिचय डॉ सचिन पोरे यांनी करून दिला. सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन डॉ विद्या अहिरे यांनी केले.

यावेळी वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, संगणकशास्त्र विद्याशाखा संचालक माधव पळशीकर, मूल्यमापन विभाग संचालक डॉ सज्जन थूल, आरोग्य विज्ञान विद्याशाखा संचालिका डॉ रश्मी रानडे, कृषी विज्ञान विद्याशाखा संचालिका डॉ माधुरी सोनवणे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, प्रा कैलास मोरे, प्रा राम ठाकर, प्रा विजयकुमार पाईकराव यांच्यासह विद्यापीठातील बहुसंख्य विद्याशाखा संचालक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page