डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त व्याख्यान
ग्रामीण भागातील लोकांना स्वयंपुर्ण करण्याचे स्वप्न पंजाबराव देशमुख यांनी 1951 साली बघितले – हेमंत काळमेघ
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित विज्ञान महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीच्या सभागृह येथे श्री. हेमंत काळमेघ, कार्यकारिणी सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांचे ‘लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख : जीवन व कार्य’ याविषयावरील व्याख्यान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन हे होते. तसेच मंचावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य तथा संचालक डॉ. संजीवनी महाले, संचालक
डॉ. जयदीप निकम, विज्ञान महाविद्यालय, नागपूर चे प्राचार्य ओमराज देशमुख हे देखील उपस्थित होते.
आपले विचार व्यक्त करतांना हेमंत काळमेघ यांनी सांगितले की, पंजाबराव देशमुखांनी आपले शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आपल्या आईला समर्पित केले होते. तर कृषि क्षेत्रातील कार्य आपल्या वडीलांना समर्पित केले होते. धर्म, जात, पंत, रंग याला वेगळ न मानता आपण सर्व एक आहोत असे ते मानत आणि म्हणूनच सर्व जाती धर्माचे मुलं/विद्यार्थी एका ठिकाणी शिक्षण आणि एका ठिकाणी रहावे या उद्देशाने त्यांनी वसतिगृह स्थापन केले. शिक्षणासोबत परिश्रम केले पाहिजे. जिवन जगत जगत घेतलेले शिक्षण हे खरे शिक्षण असे पंजाबराव देशमुख म्हणत. त्यांचा कर्मकांडावर विश्वास नव्हता, म्हणून आपल्या वडिलांच्या श्राद्धाप्रसंगी त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी नेऊन जेऊ घातले. पंजाबराव देशमख हे वेळेचे नियोजन आणि वेळेचे भान असलेले व्यक्तीमत्व होते. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्य लढा, शैक्षणिक कार्य आणि त्याचबरोबर कृषिक्षेत्रातील योगदान यांचा एकाच वेळी समतोल साधला. त्यांनी विदर्भाबरोबरच देशात इतरही ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. कृषि मंत्री असतांना त्यांनी भारतभर सभा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी दिल्ली येथे जागतिक कृषि प्रदर्शन भरविले होते. त्याप्रदर्शनास त्याकाळी जवळपास 35 लाख शेतकऱ्यांनी भेट दिली होती. 1961 साली पंजाबराव देशमुख यांच्या हिरक महोत्सवानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी शिक्षणाची गंगा बहुजनांपर्यंत नेण्याचे कार्य भाऊसाहेबांनी केले असे गौरवोद्गार काढले. त्याचप्रमाणे यशवंतरावांच्या नावाने असलेले मुक्त विद्यापीठ देखील ज्ञानगंगा घरोघरी नेण्याचे काम करत आहे असेही शेवटी काळमेघ यांनी सांगितले.
आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी सांगितले की, पंजाबराव देशमुखांचे वरील कार्यांबरोबरच राजकारणात देखील मोठे योगदान होते. समाजातील प्रश्नांच्या संदर्भात त्यांना जाण होती. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचे विविध ग्रंथ वाचले पाहिजे, म्हणजे त्यांच्या कार्याची आपल्याला सखोल माहिती मिळेल असेही त्यांनी शेवटी उपस्थितांना आवाहन केले. तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेने विद्यापीठाला कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी दिली त्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गजानन जाधव यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. पुनम वाघ यांनी केले तर आभार प्राचार्य ओमराज देशमुख यांनी मानले. संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. मधुकर शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमास विविध विद्याशाखेचे संचालक, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक उपस्थित होते.