नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभागात संविधान दिवस निमित्त व्याख्यान संपन्न
संविधानिक मूल्यांची रुजवणूक करणे आवश्यक – वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्थेचे डॉ अनिल बनकर यांचे प्रतिपादन
नागपूर : भारतीय संविधानिक मूल्यांची मानसिक रूपाने रुजवणूक करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्थेतील राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ अनिल बनकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभागात ७५ व्या संविधान दिवसानिमित्त मंगळवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी व्याख्यान पार पडले. यावेळी डॉ बनकर मार्गदर्शन करीत होते.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभाग प्रमुख डॉ अविनाश फुलझेले यांनी भूषविले. व्याख्याते म्हणून वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्थेतील राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ अनिल बनकर यांची उपस्थिती होती.
‘भारतीय संविधानाची ७५ वर्षांची वाटचाल’ या विषयावर पुढे बोलताना डॉ बनकर यांनी भारतीय सामाजिक व्यवस्थेत बऱ्याच प्रमाणात बदल झाला. मात्र, विविध धर्माचे मान्यतांचे लोक असून देखील येथील संविधान बदलले गेले नाही, याकडे लक्ष वेधले. यावरूनच भारतीय संविधानाचा आराखडा निर्माण करताना तो बारकाईने तयार केला गेला याची जाणीव होते. याउलट एकच धर्म असलेल्या देशात मध्ये निर्माण केलेले संविधान बदल झाल्याचे दिसते. एकधर्मी राष्ट्र असल्याने तो देश टिकेल? याची शाश्वती नाही, असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य खरे ठरलेले दिसते, असे डॉ बनकर म्हणाले. आज समाजामध्ये संविधानवाद हा घटक रुजविणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. संविधानवाद म्हणजे संविधानाला अपेक्षित असलेले विचार म्हणजेच मर्यादेचे पालन, मूल्य, आदर्श, नैतिकता, कर्तव्य या घटकांची अंमलबजावणी होय. अशा अपेक्षित संविधानवादाची देशातील नागरिकांत रुजावणूक करणे गरजेचे आहे, असे डॉ बनकर म्हणाले.
प्राचीन भारताचा अभ्यास करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, प्राचीन भारतातूनच संसदीय लोकशाही हे तत्व घेतले आहे. समानते बरोबरच धर्मनिरपेक्ष या तत्त्वाचाही अवलंब केला तर देशातील लोकशाही टिकून राहील. धार्मिकता, हुकूमशाही या तत्त्वामुळे अराजकता निर्माण होईल. देशातील स्थिती बिघडल्याचे अनेक उदाहरणे त्यांनी दिले. अमेरिकेच्या संविधानाच्या तुलनेत भारतीय संविधान मोठ्या काळानंतर तयार झाले आहे. मात्र, तरीही अमेरिकेत पाहिजे त्या प्रमाणात हक्क समानता दिल्याचे आढळत नाही. भारतीय संविधानाने या बाबी सुरुवातीपासूनच आपल्या संविधानात नमूद केल्याचे आढळते, असा आवर्जून उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून केला.
भारतीय संविधान निर्माण करताना विविध ६० पेक्षा अधिक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला गेला. याचबरोबर भारतीय संविधान भारतीय समाजाशी सुसंगत आहे की नाही, याचे देखील परीक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या चिंतनातून केले. त्याचबरोबर स्त्रिया, दलित आणि समाजातील दुर्बल घटकांच्या विकासाकरिता त्यांनी बऱ्याच तरतुदी केल्या आहेत. भारतीय संविधानाने अमेरिकेच्या २३५ वर्षाच्या इतिहासातही स्त्रियांना सत्तेचा अधिकार दिला नव्हता. या देशात स्त्रियांना फार नंतर हा अधिकार प्राप्त झाला. त्यानंतरही महिलांना बराच मोठा काळ सत्तेवर येण्यासाठी संघर्ष करावा लागला. या तुलनेतच भारतामध्ये महिलांना राष्ट्रपती, त्याचबरोबर प्रधानमंत्री पद भूषवले आहे. हेही केवळ ७५ वर्षातच शक्य झाले, हे भारतीय संविधानाचे सामर्थ्य असल्याचे डॉ बनकर म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ अविनाश फुलझेले यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेतील समता, स्वातंत्र्य व बंधुत्व ची देशाला खरी गरज असल्याचे सांगून देशात बंधुत्वाची भावना निर्माण केली तर बंधुत्व हे देशातील समता व स्वातंत्र्याचे रक्षण करेल असे, सांगितले. कार्यक्रमाचे संचालन भीमराव फुसे तर आभार दिलीपकुमार लेहगावकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ रमेश शंभरकर, डॉ सुभाष नगराळे, प्रा मंगेश जुनघरे, प्रा प्रीती वानखेडे, प्रा प्रमोद चिमूरकर, डॉ प्रकाश राठोड विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते.