अमरावती विद्यापीठात श्रीगोविंदप्रभू : अवलियत्वाकडून अवबोधाकडे विषयावर व्याख्यान संपन्न
श्रीगोविंदप्रभू आद्य समाजसुधारक – डॉ दिपक तायडे
अमरावती : श्रीगोविंदप्रभू हे अवलयी अवतारच होते, त्यांचं चालणं, बोलणं, वागणं सुध्दा अवलीयासारखे होते. इश्वराला रुप धारण करतांना कधी कधी अशाप्रकारचे रुप धारण करावे लागते. श्रीगोविंदप्रभू यांनी समाजामधील रुढी, परंपरा काढून टाकण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली, त्यामुळे श्रीगोविंदप्रभू यांना आद्य समाजसुधारक म्हणावे लागेल, असे विचार स्थानिक शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेमधील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ दिपक तायडे यांनी मांडले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्राच्यावतीने विद्यापीठ परिसरातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये ‘श्री गोविंदप्रभू : अवलियत्वाकडून अवबोधाकडे’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, भाषराव पावडे, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ महंत सोनपेठकर उपस्थित होते.
विषयाची मांडणी करतांना ते पुढे म्हणाले, परमेश्वरी अवतार अवबोधाकडे नेतो. श्रीगोविंदप्रभूंच्या लीळा उद्बोधक आणि सुधारणावादी होत्या. रिध्दपुरात त्यांनी तब्बल साठ वर्षे वास्तव्य केले. समाजामध्ये रूजण्यासाठी त्यांना अवलियत्व स्वीकारावे लागले. क्रियेतून त्यांनी समाजामधील रुढी, परंपरा दूर करण्याचा प्रयत्न केला. श्रीगोविंदप्रभूंचा अवतार म्हणजे एक अद्भूत आणि विलक्षण असा आहे.
अध्यासनाचा उद्देश सफल करण्याचा समन्वयकांचा प्रशंसनीय प्रयत्न – प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू म्हणाले, ज्या उद्देशाने महानुभाव अध्यासन केंद्र विद्यापीठात स्थापन करण्यात आले, तो उद्देश सफल करण्याचा समन्वयकांचा प्रयत्न अतिशय प्रशंसनीय आहे. व्याख्यातांनी विषयाची मांडणी श्रोत्यांना समजेल अशा सुंदर व सोप्या भाषेत केली. व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित श्रोतागण पाहून डॉ ढोरे यांनी उपस्थितांचे कौतुकही केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांनी महानुभाव साहित्याच्या प्रदर्शनीची पाहणी केली. यावेळी डॉ दिपक तायडे, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ महंत सोनपेठकर, सुभाषराव पावडे आदी उपस्थित होते.
चक्रधरस्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ महंत सोनपेठकर यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. संचालन डॉ संदीप जुनघरे यांनी तर आभार डॉ अण्णा वैद्य यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला अमरावती शहर तसेच परिसरातील महानुभावपंथीय महिला, पुरुष तसेच विद्यापीठातील कर्मचारी, गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.