महात्मा गांधी मिशन विद्यापीठात ‘मणिपूरचे वास्तव’ वर व्याख्यान
ईशान्य भारतातील महिलांचा देशाच्या अर्थव्यवस्थेत खारीचा वाटा – शाहू पाटोळे
छत्रपती संभाजीनगर : ईशान्य भारत हा मातृसत्ताक संस्कृतीला मानणारा आणि महिलांचा सन्मान करणारा प्रदेश असून सध्या जे काही तिकडे घडतेय ते दुर्दैवी आहे. या भागातील महिला आज सर्वच क्षेत्रात आपले योगदान देत असून व्यवसायाच्या बाबतीत पुढाकाराने कार्यरत असतात. विशेषत: देशाच्या अर्थव्यवस्थेत ईशान्य भारतातील महिलांचा खारीचा वाटा असल्याचे प्रतिपादन पूर्व भारताचे अभ्यासक व केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निवृत्त उपसंचालक, साहित्यिक शाहू पाटोळे यांनी आज येथे केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयामार्फत ‘मणिपूरचे वास्तव’ या विषयावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे शाहू पाटोळे यांचे व्याख्यान आज विद्यापीठातील व्ही. शांताराम प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले होते . यावेळी कुलपती अंकुशराव कदम, प्रा. जयदेव डोळे, प्रवीण बर्दापूरकर, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
ईशान्य भारतातील सर्वच राज्यांमध्ये सामाजिक ऐक्य अधिक असून ते आजही आपल्याला जाणवते. मात्र, मणिपूर येथे महिलांवर झालेले हल्ले निषेधार्थ असून सध्या जे सुरू आहे, ते येत्या दहावर्षापर्यंत संपणार नाही अशी भीती वाटते. आपल्यापर्यंत माध्यमांत जे काही येत आहे ते सर्वच सत्य नसून मणिपूर संदर्भात येणाऱ्या सर्वच बातम्यांवर विश्वास ठेऊ नये.वांशिक, जमातीय अस्मितांवर, हक्कांवर कुणी बाहेरचा आक्रमण करतोय असं वाटलं तर, ते आपापसातील सगळी भांडणं विसरून एकत्र येतात; हा आजवरचा ज्ञात इतिहास आहे. म्हणून ते अगोदर त्यांच्या जमातींचे असतात आणि मग ते त्यांनी जो कोणता धर्म स्वीकारलेला असेल त्या धर्माचे अनुयायी असतात. या भागात ख्रिश्चन मिशनरी यांनी अगोदर विकास केला आणि मग तेथील लोकांचे धर्मांतर केले आहे, असे श्री. पाटोळे म्हणाले.
श्री. पाटोळे म्हणाले, ईशान्य भारतातील सर्व नागरिक आपलेच असून त्यांना कोणीही नेपाळी म्हणून संबोधणे चुकीचे आहे. सध्या जो काही अपप्रचार सुरू आहे त्या मागे एकमेव अजेंडा आहे, तो म्हणजे काहीही करून मैतेईंच्या बद्दल उर्वरित भारतातील सर्वसामान्य लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करणे आणि कुकींबद्दल अर्थात ख्रिश्चनांच्याबद्दल गैरसमज पसरवणे होय. व्याख्यानानंतर शाहू पाटोळे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांचे समाधान केले .
व्याख्यानाचा अध्यक्षीय समारोप करताना श्री. डोळे म्हणाले, सध्या जे सुरू आहे हा प्रश्न धार्मिक आहे की जमातीय आहे ? हे आपण समजून घेतले पाहिजे. या लोकांकडे इतकी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यांच्याकडे आली कुठून ? कोणतेही प्रश्न शस्त्रातून सुटणारे असतील तर तिथे आणखी संविधान पोहचले नाही का? भारतीयत्व आणि राष्ट्रीयत्व याच्या आडून हिंदुत्व तिथे जाणार असेल तर हिंदुत्व आणि ख्रिश्चनिटी असा संघर्ष सुरू होणार.
या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी केले