सरस्वती भुवन महाविद्यालयात शेक्सपिअर यांचे साहित्यिक योगदान या विषयावर व्याख्यान संपन्न
छत्रपती संभाजीनगर : शतकं बदलतील, पोशाख बदलतील, मात्र, मानवी स्वभावातल्या मूलभूत भावना तशाच राहणार, जोवर या मूलभूत भावना आहेत तोवर शेक्सपिअर राहणार, असे मत सुप्रसिद्ध अनुवादक आणि शेक्सपिअर साहित्याचे अभ्यासक प्रा प्रदीप देशपांडे यांनी मांडले.
औचित्य होते सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शेक्सपिअर महोत्सवांतर्गत शेक्सपिअर यांचे साहित्यिक योगदान या विषयावर आयोजित व्याख्यानाचे. निवृत्त प्राध्यापक देशपांडे पुढे म्हणाले की शेक्सपियर देहाने गेलेत, परंतु मनाने आणि प्रतिभेने अजून आपल्यात असून ते आजही समकालीन वाटतात. त्यांच्या साहित्यात बऱ्या वाईटाचा संघर्ष आहे, त्यांच्या नाटकांनी अभिरुचीची उंची वाढवली, अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या, ते महान प्रतिभेचे लेखक होते.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात प्राचार्य डॉ मकरंद पैठणकर, प्राचार्य डॉ अनिल शंकरवार यांच्यासह उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, इंग्रजी विषयाचे अभ्यासक, शहरातील प्राध्यापक यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या भूमकर सभागृहात घेण्यात आला. सूत्रसंचालन व परिचय डॉ विलास बाविस्कर यांनी करून दिला.