एमजीएम विद्यापीठात ‘भविष्यकाळातील आव्हाने आणि शिक्षकाची भूमिका’ विषयावर व्याख्यान संपन्न
विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलेसह सामाजिक बांधिलकी निर्माण करणे शिक्षकांची जबाबदारी : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी
छ्त्रपती संभाजीनगर : शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तक, गणित आणि नुसती भाषा नसून सामाजिक दृष्टिकोनातून शिक्षकांनी शिक्षणाकडे पाहणे आवश्यक आहे. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलेसह सामाजिक बांधिलकी निर्माण करणे ही आजच्या शिक्षकांची महत्वपूर्ण जबाबदारी असल्याचे प्रतिपादन लेखक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी येथे केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ जी वाय पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे महात्मा गांधी मिशनचे माजी सचिव कै.गंगाधररावजी पाथ्रीकर यांच्या २२ व्या स्मृति दिनानिमित्त लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आज विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेरंब कुलकर्णी यांनी ‘भविष्यकाळातील आव्हाने आणि शिक्षकाची भूमिका’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी, एमजीएमचे सचिव तथा एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ प्राप्ती देशमुख, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले, सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला शिक्षणाकडे पाहणे आवश्यक असून मराठवाड्यातील बालमजुरी, ऊसतोड कामगारांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात बोलत असताना शिक्षकांच्या सक्षमीकरणावर बोलावे लागेल. अगोदरच्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षकांच्या सानिध्यात २४ तास असायचा. निवासी असलेले शिक्षण बदलत गेले आणि आज शिक्षकाची विद्यार्थ्याच्या जीवनातील भूमिका कमी – कमी होत गेली. ऋषीमुनींपासून सुरू झालेला आपला शिक्षणाचा प्रवास आज एआय शिक्षकापर्यंत येऊन पोहचला आहे.
जुन्या काळामध्ये शिक्षक हा गावपणाचे शहानपण होते. गांव हेच शिक्षकाचे विश्व होते. गावच्या ज्या सुविधा त्याच माझ्या सुविधा म्हणून त्यांनी विद्यार्थी घडविण्याचे काम केले. गावाचे जगणे आणि शिक्षकांचे जगणे यामध्ये फारसे अंतर नव्हते. कालांतराने शिक्षकांचे जगणे गावापासून वेगळे होत गेले. केवळ माहिती देणे ही शिक्षकाची भूमिका असेल तर ती भूमिका आता संपलेली आहे. शिक्षक बदलणार असतील तरच या व्यवस्थेत त्यांना महत्व असून ज्यांच्याकडे नव्या कल्पना आहेत, अशाच शिक्षकांचा येणारा काळ असेल, असे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले, देशात सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या ७० रेट डिस्ट्रिक्टमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश होतो. या १७ जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश होतो. आपण बालविवाहाच्या समस्येला जोपर्यंत हात घालणार नाहीत तोपर्यंत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढणार नाही. त्याचप्रमाणे समाजाची संवेदनशीलता आणि नैतिकता उंचाविण्यासाठी आपण शिक्षण म्हणून काय करणार आहोत, याचा विचार शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. शिक्षक म्हणून आपल्यावर असणारी सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवीत त्यांना सामाजिक भान देणे होय.
विद्यार्थ्यांना चार धडे कमी शिकवले तरी चालतील मात्र, शिक्षक म्हणून काम करीत असताना आपण विद्यार्थ्यांशी अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलले पाहिजे. लैंगिकता आणि हिंसा याबद्दल शिक्षकांनी बोलणे ही त्यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. सेक्स एज्युकेशन बद्दल शिक्षकांनी बोलले पाहिजे. समाजामध्ये प्रचंड हिंसा वाढलेली असून हिंसा आणि लैंगिकता या विषयावर शिक्षकांनी काम करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ‘इमोशनल कोशंट’ वरतीही शिक्षकांना काम करावे लागणार आहे. जगात दरवर्षी ७ लाख आत्महत्या होतात. कोरोनानंतर ३५००० विद्यार्थ्यांनी आपल्या देशात आत्महत्या केलेल्या आहेत. मुलांच्या मनात छोट्या – छोट्या गोष्टी बद्दल येणारा न्यूनगंड याबद्दल शिक्षकांनी बोलले पाहिजे. आत्मंकेंद्रीपणातून विद्यार्थ्यांना बाहेर काढून समुहाचा विचार करायला लावत त्यांना सामाजिक बनवणे ही शिक्षकांची जबाबदारी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू डॉ विलास सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले, एमजीएम विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची संपूर्णपणे अंमलबाजवणी केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण येथे उपलब्ध करून दिले आहे. वर्गातील सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार करीत विद्यापीठाने परीक्षापद्धती तयार केलेली आहे. प्रा उषा शेटे यांनी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रसिका वडाळकर व प्रा शामल महाजन यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ प्राप्ती देशमुख यांनी मानले.