डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात ‘सरकारी सेवांमध्ये समान संधी’ विषयावर व्याख्यान संपन्न
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे मेडिकल एज्युकेशन यूनिट अंतर्गत ‘सरकारी सेवांमध्ये समान संधी’ या विषयावर व्याख्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनात दिनांक २२ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते.

व्याख्याते म्हणून ज्ञानज्योती एज्यूकेशन पुणेचे संस्थापक आणि संचालक डॉ विशाल एम भेदूरकर जे महाराष्ट्र सरकारचे माजी वित्त आणि लेखाधिकारी उपस्थित होते. डॉ भेदूरकर यांनी ‘सरकारी सेवांमध्ये समान संधी’ (UPSC/MPSC) या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या शंका व प्रश्नांची व्याख्यात्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहूण्यांचा परिचय व सत्कार एमईयू समन्वयक डॉ सुषमा पांडे यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रंजना खोरगडे, सचिव, एमईयू यांनी केले तर आभार डॉ सुषमा पांडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.