डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’विद्यापीठातील भारलेले दिवस’वर व्याख्यान संपन्न
बापानं बळ तर बापमाणसानी पाठबळ दिलं – प्रख्यात कवी प्रा इंद्रजित भालेरावां चा आठवणींना उजाळा
छत्रपती संभाजीनगर : माईचा पदर धरून लहानाचा मोठ होत असताना माझ्या शेतकरी बापानं जगण्याच बळ दिल. तर विद्यापीठात मराठी विभागातील बाप माणसांनी लेखनाला पाठबळ दिले. त्यामुळे माझ्यासारखा गावखेड्यातला माणूस अगदी महानगरातही लोकप्रिय कवी होऊ शकला, तसेच जन्मदाती माय अन् काळी माय यांच्या छत्रछायेखालीच माझी जडणघडण होत होती. मात्र विद्यापीठात मराठी विभागात आलो आणि इथल्या वातावरणात मनमुक्त जगायला, वाचायला, लिहायला शिकलो, असे प्रतिपादन प्रख्यात कवी प्रा इंद्रजित भालेराव यांनी केले.



डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप बुधवारी (दि १९) करण्यात आला. तिसऱ्या दिवशी प्रा वा ल कुलकर्णी व्याख्यानमालेचे पुष्प गुंफण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ कवी व साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांनी ‘विद्यापीठातील भारलेले दिवस’ या विषयावर युवकांशी संवाद साधला.
यावेळी कार्यक्रमास विभागप्रमुख कवी डॉ दासू वैद्य, विद्यार्थी विकास संचालक डॉ कैलास अंभूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमूख व्याख्याते इंद्रजीत भालेराव यांनी संवाद साधताना असे मत मांडले की, प्रा वा ल कुळकर्णी यांनी आपल्या मराठी विभागाला वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी समीक्षक आणि साहित्यकांची एक वेगळी फळी निर्माण केली आणि माणसं घडवली. जी आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठ्या पदावर काम करीत आहेत. खरे तर विभागात इतके ज्ञानी प्राध्यापक होते की, त्यांच्या शिकवण्यामुळे आम्ही मनसोक्त जगायला शिकलो. आणि त्यांच्या सहवासामुळे हसायला शिकलो. काळीज उघडं करून आयुष्य शिकवणारी ही मंडळी म्हणजे आमचं वैभव आणि श्रीमंती होती. माझी जडणघडण इथेच झाली. आजही ईथे पुन्हा पुन्हा यावं वाटतं कारण इथेच पहिली कविता लिहिली आणि इथेच माणसं वाचायला शिकलो,असेही ते म्हणाले.
हा परिसर म्हणजे आपले घर आहे. इथली प्रत्येक गोष्ट ह्र्दयात साठवून ठेवत आम्ही जगात आहोत. ही शिदोरी आजही पुरत आहे. मराठी विभागातील प्राध्यापकांच्या शिकवण्यामुळे आम्ही जगणे शिकलो आणि सहवासमुळे हसणे देखील शिकलो, असेही ते म्हणाले. प्रा इंद्रजित भालेराव म्हणाले, मराठी भाषा आणि वाडःमय विभागात राज्यातील नामवंत प्राध्यापक, कार्यरत होते. यामध्ये प्रा वा ल कुलकर्णी, डॉ यु म पठाण, डॉ सुधीर रसाळ, डॉ एस एस भोसले, डॉ प्रभाकर भांडे, डॉ नागनाथ कोत्तापल्ले हे समीक्षा, कविता, लोकसाहित्य, संत साहित्य, ग्रामीण कथा या क्षेत्राती बाप माणसं कार्यरत होती. ’जल्म’ या गेय कवितेने प्रा भालेराव यांनी व्याख्यानाचा समारोप केला.
’माती साठीच जगावं
माती साठीच मरावं,
बाळा माता लई थोर
तीला कसं विसरावं’
प्रास्ताविकात डॉ दासू वैद्य म्हणाले की, चौदा वर्षांपूर्वी प्रा वा ल कुळकर्णी यांचं जन्मशताब्दी वर्ष होत. विभागाच्या वाढीसाठी त्यांनी भरीव योगदान दिले. समीक्षक साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर राहिली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून तत्तकालीन कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे यांनी या व्याख्यानमाला साठी मान्यता दिली. सगळ्याच बाबतीत श्रीमंत असणारा मराठी विभाग आजही वेगळी ओळख निर्माण करून आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमान गिरी यानी तर आभार राजश्री काळे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी मेहनत घेतली.
सोबत फोटो
कॅप्शन : प्रख्यात कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांचे व्याख्यान झाले. यावेळी डॉ.दासू वैद्य, डॉ.कैलास अंभुरे