शिवाजी विद्यापीठात प्रशासकीय साक्षरता व जीवन कौशल्य या विषयावर व्याख्यान संपन्न
प्रशासकीय साक्षरतेसाठी जीवन कौशल्य महत्त्वाची – डॉ रामचंद्र पवार
कोल्हापूर : प्रशासकीय साक्षरतेसाठी जीवन कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती आत्मसात करण्यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आजीवन विस्तार व कार्य विभाग संचालक प्रा डॉ रामचंद्र पवार यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र व आजीवन विस्तार व कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समूह जनजागृती कार्यक्रमांतर्गत माहिती व उदबोधन वर्ग या अनुषंगाने हंगामी रोजंदारी कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय साक्षरता व जीवन कौशल्य या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपकुलसचिव व्ही बी शिंदे होते.
डॉ पवार म्हणाले,प्रत्येक कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कामकाज करताना स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. तसेच तांत्रिक ज्ञान व कामाबद्दलची आत्मीयता वाढवली पाहिजे. इतरांवरील अवलंबत्व नाकारणे म्हणजे जीवन कौशल विकसित करणे होय.संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, माहिती देण्याची तत्परता प्रत्येकामध्ये असावी. संघटन कौशल्य त्याचबरोबर संगणक ज्ञान यासारखी कौशल्य विकसित केल्यास प्रशासकीय साक्षरता वाढीस लागते.
डॉ के बी पाटील म्हणाले, की प्रशासकीय कामकाज करताना वृत्ती,कौशल्य आणि ज्ञान महत्त्वाचे आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्याला डाटा, माहिती,ज्ञान आणि शहाणपण या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. प्रशासकीय कामकाजाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संवाद कौशल्य वाढविले पाहिजे. प्रशासकीय साक्षरतेमध्ये कायदा, डिजिकल साक्षरता व संगणक साक्षरता महत्त्वाचे आहे.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ नितीन रणदिवे यांनी केले. डॉ संजय चोपडे यांनी करून दिली. सूत्रसंचालन डॉ सचिन भोसले यांनी केले. आभार डॉ प्रकाश बेळीकट्टी यांनी मांनले.