जागतिक विज्ञान दिनानिमीत्त एमजीएममध्ये आयोजित व्याख्यान संपन्न
संशोधन व नवनिर्मितीमुळेच विज्ञानावरील विश्वास दृढ होतो – डॉ. रघुमनी सिंग
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ : जागतिक स्तरावर वैज्ञानिकांनी केलेले संशोधन व नवनिर्मितीमुळेच विज्ञान व तंत्रज्ञानावरील विश्वास दृढ होतो, असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुमनी सिंग यांनी यावेळी केले.जागतिक विज्ञान दिनानिमीत्त महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्स विभागाद्वारे दूरदृश्यप्रणालीमार्फत आयोजित अतिथी व्याख्यानामध्ये डॉ. रघुमनी सिंग हे बोलत होते. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांना मागदर्शन करीत असताना त्यांनी कॉन्टम नॅनोमटेरियलच्या आकाराप्रमाणे बदलणारे गुणधर्म व उपयोजना याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी संशोधकांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभागप्रमुख प्रा. डॉ. के. एम. जाधव यांनी बेसिक अँड अप्लाइड सायन्स विभागाच्या संशोधनातील व गुणवत्तापूर्ण शिक्षणातील वाटचालीविषयी सविस्तर माहिती सांगितली. या व्याख्यानामध्ये सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित सहभागी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रणय दिवटे यांनी केले. या व्याख्यानमालेच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रफुल शिंदे, डॉ. निकेश इंगळे, डॉ. विद्या देशमुख, मिथुन विनयराज व डॉ. गणेश पवार यांनी आपले योगदान दिले.