लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शिवाजी विद्यापीठात व्याख्यान
कोल्हापूर : लोकशाहीर आण्णा भाऊ साठे देशाचे स्वातंत्र्य, पुरूषांचा स्वाभिमान आणि स्त्रीचे चारित्र्य जपणारे जागतिक दर्जाचे महान साहित्यिक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाबूराव गुरव यांनी केले.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील वि.स. खांडेकर भाषा भवनात ‘अण्णा भाऊ साठे: वाङ्मय आणि विचारविश्व’ या विषयावरील व्याख्यान आज झाले. त्यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.गुरव बोलत होते. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.
डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, आण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तीमत्त्व बहुआयायमी स्वरुपाचे होते. साहित्यिक म्हणून त्यांच्या नावावर ३० कादंबऱ्या, २३ कथासंग्रह, एक नाटक, एक प्रवास वर्णन आणि दोनशे ते अडीचशे गाणी, लावण्या आणि १५ वगनाटये, तमाशा आहेत. त्याचबरोबर ते मोठे स्वातंत्र्यसैनिकही होते. स्वातंत्र्यलढ्यामध्ये अमरावती येथे त्यांनी एक महिना तुरूंगवास भोगला होता. अण्णा भाऊ लहानपणापासूनच अतिशय हुशार बुद्धीचे, चपळ होते. ते एक उत्तम कलावंत, आणि चांगले कुस्तीगीर आणि पट्टीचे पोहणारे होते. आण्णांचे संपूर्ण कुटुंब १९३२ साली चार महिने २२० किलोमीटरची पायपीट उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. १९३० साली त्यांनी पहिले गाणे गायले.
डॉ. गुरव पुढे म्हणाले, साहित्यरत्न आण्णा भाऊ साठेंची लेखक म्हणून नोंद घेणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या प्रयत्नातून आण्णांची ”फकीरा” ही कादंबरी शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयात ठेवण्यात आली. कालांतराने प्रतिष्ठित लेखकांनी आण्णांच्या साहित्याकडे लक्ष दिले. लेखक विश्वास पाटील यांचे आण्णांवर आधारित ”दर्दभरी दास्तान” हे फार उत्तम पुस्तक आहे. आण्णा समजावून घेण्यासाठी तरुणांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे. विश्वास पाटील यांनी प्रथमच आण्णांची तुलना जागतिक दर्जाच्या लेखकांसमवेत केली. महान साहित्यांमधून आण्णा जगात अजरामर झालेले आहेत. त्यांचे साहित्य जगातील २७ भाषांमध्ये आणि भारतातील १४ भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्यावर संशोधन सुरू आहे.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना, कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण नसताना शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंसारखी एखादी व्यक्ती उच्च प्रतीचे साहित्य निर्माण करू शकते, हे खूप आदर्शवत आहे. धावणे, कुस्ती, वाचन, लिखाण, गाणे यामध्ये ते पारंगत होते. लोकशाहीर आण्णांचे साहित्य जगभर पोहचलेले आहे, त्यांच्या साहित्यांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे.
याप्रसंगी, कुलगुरू डॉ.शिर्के यांनी वि.स.खांडेकर यांनी साहित्यरत्न आण्णा भाऊ यांच्याबद्दल लिहून ठेवलेले विचार सांगितले.
यावेळी ”अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ आणि मातंग समाज” या पुस्तकाचे लेखक व नॅक विभागाचे उपकुलसचिव डॉ.उत्तम सकट, छत्रपती शाहू क्रीडा पुरस्कारप्राप्त दीपक पाटील, सेट परीक्षा उत्तीर्ण भक्ती नाईक, शीतल पटले आणि नेट परीक्षा उत्तीर्ण अमोल देशमुख यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक डॉ.रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी विदेशी भाषा अधिविभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे, प्रभारी हिंदी अधिविभाग प्रमुख डॉ.औदुंबर सरवदे, डॉ.प्रभंजन माने, डॉ.राजाराम गुरव, डॉ.अनमोल कोठाडीया, लोकशाहीर रणजीत आशा अंबाजी कांबळे यांच्यासह साहित्यप्रेमी जनता, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी, विविध अधिविभागातील शिक्षक व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.