अमरावती विद्यापीठात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त व्याख्यान व विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
युवा ही देशाची मोठी शक्ती – स्वामी ज्ञानगम्यानंद
अमरावती : राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचा सहभाग असला पाहिजे, यावर स्वामी विवेकानंद यांचा भर होता व आपण कुठे मागे आहोत, यामागील कारणमिमांसाही त्यांनी केली होती, त्यामुळे युवा ही देशाची मोठी शक्ती आहे, असे आशयप्रधान विचार नागपूर येथील रामकृष्ण परमहंस संघाचे स्वामी ज्ञानगम्यानंद यांनी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग व स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित व्याख्यान व विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
विचारपीठावर अध्यक्षस्थानी नवोपक्रम, नवसंशधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ अजय लाड, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अधिसभा सदस्य अमित देशमुख, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर, स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक योगेश्वर कुरवाडे उपस्थित होते.
स्वामी ज्ञानगम्यानंद पुढे म्हणाले, आत्मचैतन्याचे दिव्यत्व स्वामी विवेकानंद देतात. उज्ज्वल आणि सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा भारताला स्वामी विवेकानंदांनी दिला आहे. उन्नत जीवनासाठी विवेकानंद यांनी जनसामान्यांचे उत्थान, महिलांची उन्नती, शिक्षणाचा प्रसार, राष्ट्राचा भौतिक विकास, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण असे मार्ग सांगितले आहेत. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, विद्येचे बळ ठेवा, विद्यावान व्हा, आणि स्वकर्तृत्व, आत्मबळावर मोठे व्हा. राष्ट्र उभारणीत सर्वांचा सहभाग असला पाहिजे, सुधारणावादी होण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे, देशभक्ती सदैव ह्मदयात सळसळत असली पाहिजे असे सांगून दुर्गुणांचा तत्परतेने परित्याग करा, चारित्र्यावान बना, असा उर्जावान सल्ला स्वामी ज्ञानगम्यानंद यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी दिला.
प्रमुख अतिथी अधिसभा सदस्य अमित देशमुख म्हणाले, राष्ट्र पुनर्निमाणाचे कार्य युवा पिढीकडून व्हावे, ही सर्वांच अपेक्षा आहे. दिशा देण्याचे आणि राष्ट्र निर्माणाचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. महान कार्यामुळेच महापुरुष घडलेत. विचार अंमलात आणा, जिज्ञासू व्यक्तिमत्व बना, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण मिळेल – डॉ अजय लाड
अध्यक्षीय भाषण करतांना नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ अजय लाड म्हणाले, व्याख्याते स्वामी ज्ञानगम्यानंद यांनी अतिशय उर्जावान असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या शिक्षणाचा प्रसार हा घटक निश्चितच अतिशय महत्वाचा असून नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण मिळेल, त्याचबरोबर विद्यार्थीनी सुध्दा उद्योजक व्हावे, हे विद्यापीठाचे ध्येय आहे, असेही ते म्हणाले.
विविध स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
याप्रसंगी आंतर विद्यापीठ, राष्ट्रीय स्पर्धा, युवा महोत्सव, तसेच स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राव्दारे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख, प्रमाणपत्र व गौरवग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
संत गाडगे बाबा, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक योगेश्वर कुरवाडे यांनी मनोगतातून अभ्यास केंद्राकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच व्याख्यातांचा परिचय उपस्थितांना करुन दिला.
सूत्रसंचालन व आभार डॉ अभिजित इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला रामकृष्ण परमहंस संघाचे सदस्य, विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, गणमान्य नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.