शिवाजी विद्यापीठात नेतृत्त्व विकास कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न
नेतृत्त्व विकासासाठी आजीवन अध्ययन व कौशल्य विकसित करणे आवश्यक – प्रा श्रीकृष्ण महाजन
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी नेतृत्त्व म्हणजे काय समजून घेवून त्याविषयी असलेले गैरसमज दूर केले पाहिजेत. नेतृत्त्वाची राजकारण ही पारंपारिक समज दूर करून मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्त्व करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. व्यावसायिक व व्यवस्थापकीय दृष्टीकोनातून नेतृत्त्व संकल्पनेकडे पाहिजे. अजीवन व निरंतर शिक्षण घेतले तरच नेतृत्व विकास होऊ शकतो असे प्रतिपादन विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नेतृत्त्व विकास कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. राजू श्रावस्ती व डॉ. विद्यानंद खंडागळे उपस्थित होते.
प्रा. महाजन पुढे बोलताना म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने व व्यक्तीने आपल्या कामगिरीचे वारंवार मोजमाप केले पाहिजे. नेत्तृत्व म्हणजे दुसरे काही नसून नियोजनाच्या माध्यमातून भविष्याचे वेध घेणारे निर्णय तत्परपणे घेत राहणे होय. “केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार” या उक्तीप्रमाणे वर्तन केल्यास नेतृत्त्व गुण वाढण्यास मदत होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अविनाश भाले यांनी केले. तर आभार डॉ. किशोर खिलारे यांनी मानले.
या कार्यक्रमामध्ये सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स, पुणे येथील प्राध्यापक डॉ. राजू श्रावस्ती यांनी ‘स्व’ आणि नेतृत्त्व विकास याविषयावर तर डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी संवाद कौशल्य आणि नेतृत्त्व विकास या विषयावार मार्गदर्शन केले. विद्यार्थांना नेतृत्त्व संकल्पना समजून यावी व तिचा त्यांच्यामध्ये विकास व्हावा यासाठी त्यांनी नेतृत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना समजावून सांगताना विविध खेळ व प्रयोगावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली. विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या क्षमता वृद्धिंगत झाल्या पाहिजेत यासाठी अभ्यास केंद्राच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विविध अधिविभागातील विद्यार्थी व संशोधक सहभागी झाले होते. डॉ. किशोर खिलारे, शरद पाटील व साहिल मेहता इत्यादींनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतेले.