अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा पथनाट्याद्वारे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विधी विभागातील विद्यार्थ्यांनी बहिरम, खरपी, परतवाडा येथे पथनाट्याव्दारे कायदेविषयक जनजागृती केली. अध्यापन संशोधन विकास आणि विस्तार या उपक्रमातर्गत सदर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, बालमजुरी, दारू प्रतिबंधक कायदा, अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याची पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे, डॉ. एम. एम. धांडगे, विधी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार चौबे, डॉ. कल्पना व्ही. जावळे यांची उपस्थिती होती. खरपी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला डॉ. कल्पना व्ही. जावळे, सरपंच योगेश भोसले यांची उपस्थिती होती. बहिरम येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. यादवरावदादा विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश श्रीवास, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विधी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार चौबे यांची उपस्थिती होती. पर्यावरण संवर्धन, दारूबंदी अशा ज्वलंत विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्याव्दारे कायद्याची जनजागृती केली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. कल्पना जावळे, प्रा. तृप्ती रावत, प्रा. खुशबू झांझोटे, प्रा. राजकुमार कटकतलवारे, प्रा. चेतन उघडे, मुरलीधर खोपडे यांनी परिश्रम घेतले.